स्वाईन फ्ल्यूची वणी तालुक्यात दस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:41 PM2017-09-29T23:41:18+5:302017-09-29T23:41:28+5:30
दमट वातावरणामुळे सशक्तपणे सक्रीय झालेल्या स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूने वणी तालुक्यात दस्तक दिली आहे. तालुक्यातील मेंढोली येथील एका इसमाचा या आजाराने मृत्यू झाल्याने नागरिकांत भय पसरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : दमट वातावरणामुळे सशक्तपणे सक्रीय झालेल्या स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूने वणी तालुक्यात दस्तक दिली आहे. तालुक्यातील मेंढोली येथील एका इसमाचा या आजाराने मृत्यू झाल्याने नागरिकांत भय पसरले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य उपचार व काळजी घ्यावी, त्यातून आजारावर मात करणे सोपे जाईल, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, या विषयात शासनाच्या आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली असून या आजारावर उपचार करण्यासाठी मुबलक औैषध साठा उपलब्ध करण्यात येत आहे.
गेल्या महिन्याभरात स्वाईन फ्ल्यूच्या आजाराची लक्षणे असणारे किमान १० ते १२ रुग्ण वणी तालुक्यात आढळून आलेत. त्यांपैकी मेंढोलीत एकाचा मृत्यू झाला. या आजाराच्या विषाणूने भद्रावती, घुग्घूस मार्गे वणी तालुक्यात प्रवेश केल्याचे सांगण्यात येते. सर्वप्रथम शिंदोला परिसरात हा विषाणू सक्रीय झाला. त्या पट्टयातील काही गावांमध्ये स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असलेले रुग्ण आढळून आलेत. मात्र योग्य उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
वणी शहरातही एका महिलेला स्वाईन फ्ल्यू झाल्याच्या शंकेवरून नागपूरला उपचारासाठी हलविण्यात आले. तिच्याही प्रकृतीत आता सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या आजाराचे निदान करणाºया प्रयोगशाळा राज्यात केवळ चार ठिकाणी आहेत. नागपूर, पुणे येथे प्रत्येकी एक व मुंबईत दोन प्रयोगशाळा आहेत. आजाराच्या निदानाचा अहवाल प्राप्त होण्यासाठी किमान १० ते १२ दिवस लागतात. निदान हाती लागल्यानंतर रुग्णावर उपचार केले जायचे. त्यामुळे उपचाराला विलंब होऊन रुग्णाची प्रकृती खालावत असे. मात्र आता ज्या रुग्णात स्वाईन फ्ल्यूची लक्षणे दिसतात, त्यांच्यावर तातडीने त्याच आजारासंदर्भात लागणारा औषधोपचार केला जात आहे.
सध्या या भागातील वातावरण अतिशय दमट आहे. त्यामुळे विविध आजारांच्या विषाणूंचा फैैलाव वेगाने होत आहे. प्रत्येकच घरात सर्दी, ताप, खोकला, अशा सामान्य आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत.
अशी घ्यावी काळजी
१) गर्दीच्या ठिकाणे शक्यतोवर जाणे टाळावे.
२) हस्तांदोलन करु नये.
३) वारंवार हात धुवून स्वच्छ करावे.
४) शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल ठेवावा.
५) सर्दी, तापाच्या रुग्णांनी ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा.
अशी आहेत लक्षणे
१) सर्दी, खोकला होणे.
२) तीव्र स्वरूपाचा ताप येणे.
३) गळ्यात दुखणे.
४) श्वास घेण्यासाठी त्रास होणे.
स्वाईन फ्ल्यू या आजारावर चांगल्या पद्धतीची औषधी उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य काळजी आणि उपचार घेतल्याने हा आजार निश्चितपणे बरा होतो. कुणाला स्वत:मध्ये अशी लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. त्यातून या आजारावर नियंत्रण मिळविणे सोपे जाते.
-डॉ.गणेश लिमजे, वणी