दिवटेच्या खुनाचा तपास जिल्ह्याबाहेर सोपवावा
By admin | Published: August 29, 2016 01:00 AM2016-08-29T01:00:52+5:302016-08-29T01:00:52+5:30
येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा कुख्यात प्रवीण दिवटे याच्या खुनाचा तपास जिल्ह्याबाहेरील पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवावा
कुटुंबीयांची पत्रपरिषद : यवतमाळच्या पोलिसांच्या प्रामाणिकतेवर संशय
यवतमाळ : येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा कुख्यात प्रवीण दिवटे याच्या खुनाचा तपास जिल्ह्याबाहेरील पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवावा, अशी मागणी दिवटे कुटुंबियांनी रविवारी पत्रपरिषदेतून केली आहे. स्थानिक पोलीस दलातील एका अधिकाऱ्याच्या सापत्न वागणुकीमुळेच हत्या झाल्याचा आरोपही त्यांनी या पत्रपरिषदेत केला.
यवतमाळातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे खुनातील आरोपींशी आर्थिक संबंध आहे. त्यांच्या सांगण्यावरून एका पोलीस उपनिरीक्षकाने प्रवीणच्या खासगी अंगरक्षकांना त्याच्यापासून दूर करण्याचे काम केले. कुठलेही कारण नसताना या अंगरक्षकांना यवतमाळातील नागपूर बायपासवर नेऊन बेदम मारहाण केली जात होती. प्रवीणपासून दूर रहा, असे सांगण्यात येत होते. हा धडाका २४ आॅगस्टपूर्वीपासूनच सुरू होता. आता अशाच अधिकाऱ्यांकडे खुनाच्या गुन्ह्याचा तपास असल्याने न्याय मिळणार नाही, असे प्रवीण दिवटे यांच्या कन्या सृष्टी व श्वेता यांनी पत्रपरिषदेत सांगितले. पोलीस राजकीय दबावात काम करीत आहे. यातूनच विरोधी टोळीला पुरक वातावरण तयार होईल, असे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहे. त्यांच्यातील सक्रिय गुन्हेगारांवर आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई पोलिसांकडून करण्यात आली नाही. याला केवळ स्थानिक अधिकाऱ्याचे गुन्हेगारांशी असलेले आर्थिक हितसंबंधच कारणीभूत असल्याचा आरोप सृष्टी दिवटे हिने केला. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईल फोनचे मागील सहा महिन्यातील कॉल डिटेल्स काढल्यास हे स्पष्ट होईल. त्यामुळे आता अशा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तपास योग्य होणे शक्य नाही. प्रशासनाने इतर जिल्ह्यातील कोणत्याही अधिकाऱ्याकडे या खुनाचा तपास सोपवावा, अशी मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचे तिने सांगितले.
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नाव माहीत असलेल्याच आरोपींची नावे नमूद केली आहे. मात्र प्रत्यक्षात हल्ला करताना नाव माहीत नसलेले ओळखीचे चेहरेही होते. तशा संशयितांबाबत आपण पोलिसांकडे यादी दिली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी या आरोपींना ताब्यात घेतल्यास मी सहज ओळखू शकते, असे सृष्टी दिवटे हिने सांगितले. खुनाच्या घटनेनंतरच आठवडी बाजार, शारजा चौक, शनि मंदिर चौक येथे फटाके फोडण्यात आले. इतकेच नव्हे तर आठवडी बाजार परिसरातील जुन्या घरासमोर हातात तलवारी घेऊन काहींनी धुडगुसही घातल्याचे यावेळी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)
आरोपींची गय नाही - राहुल मदने
प्रवीण दिवटे खून प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडीही जप्त केली आहे. कायदेशीर कारवाई सुरू असून सर्व बाजूने तपास करुन गुन्हेगारांना गजाआड केले जाईल, कुणाचीही गय केली जाणार नाही, असे यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी सांगितले.