उमरखेड तालुक्यात कर्जफेडीसाठी तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:39 AM2021-03-07T04:39:00+5:302021-03-07T04:39:00+5:30
उमरखेड : एक वर्षापासून कोरोनाने सर्वांचे जगणे कठीण केले. वारंवार लॉकडाऊन होत आहे. या संकटात आता बँकांनी नागरिक व ...
उमरखेड : एक वर्षापासून कोरोनाने सर्वांचे जगणे कठीण केले. वारंवार लॉकडाऊन होत आहे. या संकटात आता बँकांनी नागरिक व शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीचा तगादा लावला. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व नागरिक हवालदिल झाले आहे.
अनेकांनी पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकाकडून शैक्षणिक कर्ज घेतले. फेब्रुवारी महिन्यापासून काही बँका मोबाइल संपर्क आणि खेडेगावात प्रत्यक्ष जाऊन कर्ज परतफेडीसाठी तगादा लावत आहे. व्यवस्थापकांना गंभीर परिस्थितीची जाणीव करुन दिली तरीही बँकांचे वसुली कर्मचारी जुमानत नाही. वसुली उद्दिष्टपूर्ती करून वरिष्ठांना दाखविण्यासाठी मनमानी धोरण अवलंबत आहे.
कोरोनामुळे वारंवार बाजारपेठ, कंपन्या, अन्य प्रतिष्ठाने यावर वेळेचे बंधने प्रशासनाने लादले आहे. अशाही परिस्थितीत काम करण्याची इच्छा असताना काम मिळत नाही. त्यामुळे आर्थिक अडचण आहे. हाताला काम नाही. रोजचे कौटुंबिक जीवन जगणे कठीण झाले आहे. आर्थिक ओढाताण होत आहे. बँकेचे वसुली कर्मचारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. कर्ज परतफेडीसाठी त्यांचा तगादा सुरूच आहे.
बॉक्स
शेतकरी, नागरिक झाले हतबल
हातबल शेतकरी व पालकांना सध्या काहीही सुचेनासे झाले आहे. वसुलीच्या तगाद्याने ते हवालदिल झाले आहे. या वसुलीवर वरिष्ठांनी लगाम घालावा, अशी अपेक्षा आहे. शासनाने कर्जधारकांना तत्काळ दिलासा देण्याची नितांत गरज आहे.