नेर तालुक्यामध्ये पाण्यासाठी टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:31 PM2019-04-22T21:31:31+5:302019-04-22T21:31:51+5:30
दरवर्षी पाणीटंचाई उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च केले जाते. या योजना तकलादू असल्याने पाणी समस्या कायम आहे. तालुक्याच्या १७ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हा प्रश्न तीव्र झाला आहे. हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांमधील कामे बोगस होत असल्याने समस्या गंभीर होत चालली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : दरवर्षी पाणीटंचाई उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च केले जाते. या योजना तकलादू असल्याने पाणी समस्या कायम आहे. तालुक्याच्या १७ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हा प्रश्न तीव्र झाला आहे. हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांमधील कामे बोगस होत असल्याने समस्या गंभीर होत चालली आहे.
तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने होरपळून निघत आहे. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून अनेक कामे करण्यात आली. या अंतर्गत झालेल्या कामांचा दर्जा निकृष्ट राहिला आहे. विहिरींना भरपूर पाणी असतानाही केवळ बोगस पाईपलाईनमुळे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही. काही ठिकाणी टाक्या निकृष्ट, तर मोटारपंपाचा दर्जा सुमार आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते.
तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शेततळ्यांसाठी तीन गावांची निवड करण्यात आली. शेततळ्यासाठी ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून द्यावी, असे संकेत आहे. दोन ग्रामपंचायतींनी जागा दिली मात्र इंद्रठाणा ग्रामपंचायतीने अजूनही यादृष्टीने पाऊले उचलली नाहीत. पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहे. शेततळे पूर्ण होऊन त्यात पाणी केव्हा जमा होणार हा प्रश्न आहे. आजंती, चिकणी, मांगलादेवी, वटफळी, शहापूर आदी गावांमध्ये पाण्यासाठी लोकांची अक्षरश: जागल सुरू आहे.
ग्रामस्वच्छता अभियान रखडले
तेराव्या वित्त आयोगातून ग्रामस्वच्छता अभियान, रस्त्याचे डांबरीकरण, पाण्याची मुबलक सोय अशा कामांना प्राधान्य दिले जाते. लाखो रुपयांचा निधी यासाठी उपलब्धही करून देण्यात आला. मात्र सद्यस्थितीत ग्रामस्वच्छता अभियान थांबले आहे. हागणदारीमुक्त गाव अभियानाचे तीनतेरा वाजले आहे. रस्त्याच्या कामात गैरप्रकार वाढले आहे. यावर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे दिसून येते.