ताईबाई अक्का, विचार करा पक्का..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 10:36 PM2019-03-07T22:36:09+5:302019-03-07T22:36:43+5:30
ताईबाई अक्का विचार करा पक्का... मतदानाच्या मोसमात ही टॅगलाईन सर्रास वापरली जाते. प्रत्यक्षात ग्रामीण भागात मोलमजुरी करणाऱ्या लाखो आयाबायांची मते कुणाला मिळावी, हे पुरुषच ठरवितात.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ताईबाई अक्का विचार करा पक्का... मतदानाच्या मोसमात ही टॅगलाईन सर्रास वापरली जाते. प्रत्यक्षात ग्रामीण भागात मोलमजुरी करणाऱ्या लाखो आयाबायांची मते कुणाला मिळावी, हे पुरुषच ठरवितात. कोणत्या तरी राजकीय आॅटोरिक्षात कोंबून महिलांना मतदान केंद्रावर नेऊन पुरुषी हुकमानुसारच त्यांची मते वाटेल तशी वळविली जातात. एकीकडे स्त्री-पुरुष समानता, राजकारणात महिलांना आरक्षण हे विषय चर्चेत असताना दुसरीकडे लाखो महिलांच्या मतस्वातंत्र्यावर खुलेआम घाला घातला जात आहे. ८ मार्च रोजी साजऱ्या होणाºया जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील खेडूत महिलांच्या मतपारतंत्र्याचा हा धांडोळा...
मतदान केंद्रावर प्रत्येकाने स्वमर्जीने जावे, स्वत:च्या विवेकबुद्धीनेच उमेदवार निवडावा हा लोकशाहीचा आत्मा. पण महिलांच्या बाबतीत असे घडत नाही. विशेषत: जिल्ह्यातील खेड्यापाड्यांमध्ये आजही महिलांची गठ्ठा मते कोणत्याही एकाच उमेदवाराकडे ‘वळविण्या’ची कारस्थानी व्यवस्था कार्यरत असते. शेतात घाम गाळणाºया, जंगलात गुरं चारणाऱ्या, वय झालेल्या अनेक महिलांची मते त्यांची स्वत:ची उरतच नाही, त्यांच्या स्वत:च्या मताने पडतच नाही. गावपुढाऱ्याच्या हुकमानुसार दुसरे ‘मत’ महिलांवर लादले जाते अन् महिला मन मारून पुरुष सांगेल त्याच बटनावर बोट ठेवते. चार दोन महिला आरक्षणातून निवडून आल्या म्हणजे, राजकीय पटलावर महिलांना न्याय मिळाला असा अर्थ होत नाही. प्रत्यक्ष मतदान करणाºया ग्रामीण महिलांचे मतस्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आयोगाने ‘वॉच’ ठेवण्याची गरज आहे. मुळात ताईबाई अक्कानेच याचा पक्का विचार करण्याची गरज आहे.
गलंग म्हतारीले मद्दानाले नेते, पन दवाखान्यात नाई
पिंपळगावच्या कविता वाढई म्हणाल्या, बायायची मतं कोणीबी येऊन फिसकवून टाकते. म्हून मंग कोणीतरी जिम्मेदार मानूस यॅटो करून सर्व्या बायायले एकखट्टा मद्दानाले घेऊन जाते. आसं नेयमीच होते... कविता वाढई यांच्या या विधानातून ग्रामीण स्त्रियांच्या मतदानातील ‘दबावतंत्र’ उघड होते. पण कवितासारख्या काही महिला आता हुशार झाल्या आहेत. त्या म्हणतात, ‘तू नेतं का? तं ने. पण मत मी माया मतानं देईन गड्या! येकांदी म्हतारी पार गलंग होऊन राह्यते. बाजीले चिकटून मरणाची वाट पाह्यत राह्यते, तरीबी यॅटो करून लोकं तिले मतदानाले नेते. पण त्याच्या पह्यले तिले कोणी दवाखान्यात नेत नाई.’ कविता वाढई यांनी वर्षानुवर्षे गावात पाहिलेली ही महिलांच्या मतदानाची वास्तव स्थिती आहे.
आॅटो सुविधा म्हणजे आमिषच
मतदानाच्या दिवशी गावात येणारे आॅटो ही एक सोय असली तरी त्या सुविधेआडून महिलांची मते बळकावली जात आहे.