प्रजासत्ताक दिनी गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा; प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाची राज्यपालांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 06:52 PM2020-01-26T18:52:21+5:302020-01-26T18:52:46+5:30
प्रजासत्ताक दिनी अनुपस्थित नगरपरिषद पदाधिकाऱ्यांना निलंबित करा.
यवतमाळ - २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस साजरा करण्याकरीता देशातील पंतप्रधानांपासून तर सरपंच पदावरील लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य सरकार, शासकीय-निमशासकीय , सहकारी-सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी-कर्मचारी व नागरिक व विध्यार्थी सर्वत्र गल्लीपासून तर दिल्ली पर्यंत गणतंत्र दिन उत्सव साजरा करण्यात व्यस्त असताना घाटंजी नगरपरिषद पदाधिकारी अध्यक्षा(प्रथम नागरीक), उपाध्यक्ष, सर्व सभापती व काही नगरसेवक मात्र MLC निवडणूकीचे घोडेबाजारात सहभागी होऊन जिवाची हौस भागविण्याकरिता पर्यटनाकरीता दौऱ्यावर गेले आहे.
नगरपरिषद कार्यालय, आझाद मैदान, न. प. शाळेच्या झेंडा वंदन कार्यक्रमाकरीता पदधिका-यांचीच उपस्थिती नव्हती, हा नागरिकांचा व देशाचा घोर अपमान आहे, देशाशी बेईमानी व गद्दारी आहे. तेव्हा या सर्व झेंडा वंदनास अनुपस्थित नगरपरिषद पदाधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी राज्यपाल यांना घाटंजीच्या तहसीलदार पुजा माटोडे यांच्या मार्फत प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया चे विदर्भ संघटक मधुकर निस्ताने यांचे नेत्रुत्वात निवेदन देण्यात आले.
घाटंजी नगरपरिषद पदाधिका-यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकसी उपविभागीय महसूल अधिकारी, केळापूर यांनी केली आहे, त्या चौकशीत विद्यमान अध्यक्षा व उपाध्यक्ष दोषी ठरविण्यात आले आहे, कार्यवाही मात्र अद्याप झालेली नाही, याचा खेद वाटतो याबाबत गंभीर दखल घ्यावी, असेही निवेदनातून कळविण्यात आले आहे.