अव्वाच्या सव्वा शुल्क मागणाऱ्या पुसदच्या हॉस्पिटलवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:42 AM2021-04-24T04:42:47+5:302021-04-24T04:42:47+5:30
येथील पुसद अर्बन बँकेत कार्यरत नितीन विजय श्रोते यांच्या आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणे ...
येथील पुसद अर्बन बँकेत कार्यरत नितीन विजय श्रोते यांच्या आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणे अनिवार्य होते. बँकचे अध्यक्ष शरद मैंद यांनी त्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका बेडची तजवीज झाल्याचे सांगितले. त्यानंतर श्रोते यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना जनरल वाॅर्डचे आठ हजार रुपये प्रतिदिवस, स्पेशल रूमचे (१रूममध्ये २ जण) १०हजार रुपये दररोज चार्ज लागतील, असे सांगण्यात आले, असा त्यांचा दावा आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेपेक्षा कितीतरी जास्त असणारा हा खर्च झेपावणार नसल्याने त्यांनी पुन्हा शरद मैंद यांना संपर्क साधला. मैंद यांनी दुसऱ्या रुग्णालयात बेड उपलब्ध करून दिला. सध्या श्रोते यांच्या आईवर तेथे उपचार सुरू आहे. मात्र, ‘त्या’ रुग्णालयात मनमानी कारभार सुरू असून कोविडच्या संकटात शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वैद्यकीय दर आकारले जात नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे सर्वसामान्यांची होणारी लूट थांबवावी, या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा शल्य चिकित्सक तरंगतुषार वारे यांना निवेदन दिले आहे.
कोट
आम्ही शासनाने निर्धारित रेट नुसारच शुल्क घेतो. कोणत्याही प्रकारे अनामत रक्कमसुद्धा घेत नाही. हॉस्पिटलकडून रुग्णाची लूट होत आहे, या आरोपात तथ्य नाही.
डॉ. सतीश चिद्दरवार, संचालक, मेडिकेअर मल्टीस्पेशासलिस्ट हॉस्पिटल, पुसद.