आई-वडिलांचा सांभाळ निष्काम भावनेने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:51 PM2018-12-21T23:51:56+5:302018-12-21T23:52:01+5:30
केवळ समाजाला दाखविण्यासाठी आई-वडिलांची सेवा करू नका तर निष्काम भावनेने त्यांचा सांभाळ करा. त्यांच्या खऱ्या सेवेतूनच जगण्याची नवी दृष्टी प्राप्त होते, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केवळ समाजाला दाखविण्यासाठी आई-वडिलांची सेवा करू नका तर निष्काम भावनेने त्यांचा सांभाळ करा. त्यांच्या खऱ्या सेवेतूनच जगण्याची नवी दृष्टी प्राप्त होते, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.
अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारात दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघातील रुग्णांसाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित नेत्रशस्त्रक्रिया शिबिराच्या अनौपचारिक उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते श्रीधर मोहोड यांच्यासह जे.जे. हॉस्पिटलच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. रागिनी पारेख, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, नेत्रशास्त्र विभागाचे डॉ. सुधीर पेंडके आदी उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालयात २४ डिसेंबरपर्यंत हे शिबिर चालणार आहे. दिग्रस-दारव्हा-नेर तालुक्यात नेत्रतपासणी शिबिरात निवड झालेल्या तब्बल एक हजार ५०० रुग्णांवर डॉ. तात्याराव लहाने व जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथून आलेली ४० डॉक्टर्सची चमू नेत्र शस्त्रक्रिया करणार आहे. सर्व रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया आपण स्वत: करणार असल्याचे डॉ. लहाने यांनी यावेळी सांगितले.
२२, २३ व २४ डिसेंबर रोजी सर्व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेकरिता आलेले रुग्ण व नातेवाईकांची निवास व भोजनाची व्यवस्था ना. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात माँ आरोग्य सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना ना. संजय राठोड यांच्याकडून मोफत चष्मे वितरित केले जाणार आहे. शिबिरासाठी हरिहर लिंगनवार, शिबिर संयोजक घनश्याम नगराळे, शेखर राठोड, विकास क्षीरसागर, अमित मेहरे, राजू गिरी आदी परिश्रम घेत आहेत.
‘प्रतिसाद’ची माघार
शिबिरासाठी मदतीचे आवाहन येथील प्रतिसाद फाऊंडेशनला वैद्यकीय महाविद्यालयातर्फे करण्यात आले होते. मात्र सदर शिबिर राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे समजताच फाऊंडेशनने सेवेतून माघार घेतली. तसे पत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाने यांनी अधिष्ठातांना दिले.