घराप्रमाणे गावाचीही काळजी घ्यावी
By Admin | Published: February 7, 2016 12:37 AM2016-02-07T00:37:21+5:302016-02-07T00:37:21+5:30
घराची जडणघडण ही महिलाच चांगल्या प्रकारे करू शकतात. सुंदर घरासाठी सुंदर मन आवश्यक असते. यासाठी आंतरिक सुंदरता महत्त्वाची असते.
विजय दर्डा : दत्तक ग्राम भारी येथे ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन
यवतमाळ : घराची जडणघडण ही महिलाच चांगल्या प्रकारे करू शकतात. सुंदर घरासाठी सुंदर मन आवश्यक असते. यासाठी आंतरिक सुंदरता महत्त्वाची असते. या सुंदरतेतूनच आपण घराची काळजी घेतो. त्याप्रमाणे गावाचीही काळजी घ्यावी, असे आवाहन लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडीटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा खासदार विजय दर्डा यांनी केले. सांसद आदर्श ग्राम योजनेतून भारी येथील ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन शनिवारी झाले. यावेळी ते बोलत होते.
खासदार दर्डा पुढे म्हणाले, सुंदर मन घडविण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षित डोक्यातूनच जगात अनेक आविष्कार आले आहेत. विज्ञान आणि प्रकृतीत यातूनच बदल करता आला आहे. यामागे विकासात्मक विचार असणे आवश्यक आहे.
प्रत्येकाने स्वत:ला प्रश्न विचारून आपण घराप्रमाणे गाव स्वच्छ ठेवतो काय याचे चिंतन केले पाहिजे. तशी शपथही येथे घेतली पाहिजे. मानवी आरोग्यासाठी स्वच्छ पाणी, नाला, गटारे, शौचालय आवश्यक आहे. मात्र या सर्वांसाठी एक सुंदर विचार हवा आहे. तो विचार गावातील महिलाच देऊ शकतात, असे खासदार दर्डा यांनी कार्यक्रमाला उपस्थित बहुसंख्य महिलांना संबोधित करताना सांगितले. सर्वांनीच सहकार्य करून शिक्षणाची चळवळ उभी केली पाहिजे. शिक्षणामुळे या गावातून देशाचे नेतृत्वही मिळू शकते.
आपल्याकडे संस्काराची प्रगल्भ अशी शिदोरी असल्याने आपण कुठेच कमी पडणार नाही. फक्त गरज आहे ती सूक्ष्म नियोजनाची. भारी या दत्तक गावात वर्षभरापासून कामांचे नियोजन सुरु आहे. सातत्याने बैठका व पाठपुरावा केला जात आहे. चांगल्या कामासाठी योग्य नियोजन आवश्यक असते. त्या नियोजनातच वेळ होत असल्याने सध्या अपेक्षित काम दिसत नाही. मात्र ग्रामस्थांचे सहकार्य आणि जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढाकारात निश्चितच देशपातळीवरचे आदर्शग्राम म्हणून भारीची ओळख निर्माण करता येईल, असा आशावाद खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केला. या कामात काही चुका झाल्यास ग्रामस्थांनी निर्भयपणे पुढे येऊन सांगावे, असे आवाहनही यावेळी केले.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. तर प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. मंचावर माजी आमदार कीर्ती गांधी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, पंचायत समिती सभापती गायत्री ठाकूर उपस्थित होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)
चौरस आहाराचा शुभारंभ
राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने सुरू केलेल्या चौरस आहार योजनेचा शुभारंभ खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेतून गरोदर व स्तनदा मातांना सहा महिन्यांपर्यंत पोषण आहार दिला जातो. या पोषण आहाराची तपासणी स्वत: खासदार दर्डा यांनी केली. केवळ २५ रुपयांत हा आहार देणे कसे शक्य होते, असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शौचालय धनादेश वितरण
वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या ग्रामस्थांना स्वच्छ भारत मिशनमधून धनादेश देण्यात आले. त्याचे वितरण खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते झाले. चिंतामण निखाडे, वसंता गाडेकर, बळीराम मांगूळकर यांना धनादेश दिले, तर शिवणकला प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र रेणुका मेश्राम यांना प्रदान करण्यात आले.