हजाराची प्रेरणा घ्या, अन् लाखाची वर्गणी आणा!
By admin | Published: March 31, 2017 02:19 AM2017-03-31T02:19:47+5:302017-03-31T02:19:47+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी शिक्षकांनी गेल्यावर्षी स्वयंस्फूर्तीने लोकवर्गणी गोळा केली.
‘शिक्षण’चा दट्ट्या : केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना ‘मागण्या’चे ट्रेनिंग
यवतमाळ : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी शिक्षकांनी गेल्यावर्षी स्वयंस्फूर्तीने लोकवर्गणी गोळा केली. शाळा सुधारल्या. मात्र, शिक्षकांची ही ‘विश्वासार्हता’ हेरून प्रशासन आता त्यांना अधिकृतरीत्या वर्गणी गोळा करण्यासाठी जुंपणार आहे. त्यासाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना प्रशिक्षित करण्यात येणार असून ‘प्रेरणा सभा’ घेण्याचे आदेश आहेत.
येत्या शैक्षणिक सत्रात पालकांकडून जिल्हा परिषदेच्या शाळांना आर्थिक मदत मिळावी, याकरिता शिक्षकांनी कसे प्रयत्न करावे, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्र शाळेवर त्यासाठी ‘प्रेरणा सभा’ आयोजित करण्यात येणार आहे. या प्रेरणा सभेमध्ये केंद्र शाळेअंतर्गत येणाऱ्या विविध गावांतील पालकांना निमंत्रित करण्यात येईल. सोबतच प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापन समितीतील दोन सदस्य, मुख्याध्यापक, त्या-त्या परिसरातील लोकप्रतिनिधी यांनाही बोलावण्यात येईल. या सर्वांना वर्गणी देण्याची ‘प्रेरणा’ देण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. ही सभा घेण्यासाठी प्रत्येक केंद्र शाळेला केवळ १ हजार ११५ रुपयांचा निधी मिळेल. सभेचे फलित म्हणून शिक्षकांनी लाखो रुपयांची लोकवर्गणी गोळा करून दाखवायची आहे. येत्या ५ एप्रिलपर्यंत प्रत्येक केंद्रात सभा घेऊन त्याचा अहवालही शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविला आहे.
सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत ‘लोकसहभागातून गुणवत्ता वाढीकडे’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात ग्रामीण भागातील शिक्षकांनी ही संकल्पना गेल्यावर्षी कोणताही आदेश नसताना राबविली. त्यांनी शाळा डिजिटल केल्या. जिल्ह्यात व राज्यात शिक्षकांच्या आवाहनाला पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला. शिक्षकांचा हाच ‘गुण’ आता प्रशासन ‘कॅश’ करण्याच्या मनस्थितीत आहे. मात्र आजवर विद्यार्थीहितासाठी म्हणून लोकवर्गणी मिळविणारे शिक्षक प्रशासनाच्या लेखी आदेशाला कितपत प्रतिसाद देतात, याबाबत साशंकता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)