अवघे १७० रुपये घ्या अन् पोरांना नवे बूट द्या, पुसद उपविभागाला सर्वाधिक निधी
By अविनाश साबापुरे | Published: August 4, 2023 09:02 PM2023-08-04T21:02:24+5:302023-08-04T21:02:31+5:30
शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याला मिळाले आणखी सव्वा तीन कोटी
यवतमाळ : बाजारात स्वस्तात स्वस्त बूट ४०० ते ५०० रुपयांचा असताना शासनाने मात्र समग्र शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांच्या बुटासाठी केवळ १७० रुपये दिले आहेत. गणवेशाचा निधी आल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या बूट खरेदीसाठीही जिल्ह्याला तब्बल तीन कोटी १९ लाख २५ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या पुसद, उमरखेड, महागाव आणि दिग्रस तालुक्यात जवळपास ४० टक्के निधी दिला गेला आहे.
प्रतिविद्यार्थी १७० रुपये यानुसार एकंदर एक लाख ८७ हजार ७९५ विद्यार्थ्यांसाठी हा निधी आला आहे. समग्र शिक्षा कक्षातून तालुक्यांना तो वितरित करण्यात आला आहे. या १७० रुपयांमधून शाळा व्यवस्थापन समितीला प्रत्येक विद्यार्थ्याला एक जोडी बूट तसेच पायमोज्यांचे दोन सेट खरेदी करून द्यायचे आहे. इतक्या तुटपुंज्या पैशात ही खरेदी कशी होणार, हा मोठा प्रश्न शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांपुढे निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना या निधीचा लाभ देणे बंधनकारक आहे.
इतर तालुक्यांच्या तुलनेत पुसद उपविभागातील चार तालुक्यांमध्ये विद्यार्थी संख्या प्रचंड आहे. ७४ हजार ४९८ इतके लाभार्थी असल्यामुळे या उपविभागाला एकूण निधीपैकी एक कोटी २६ लाख ६४ हजार रुपये दिले गेले. तर वणी उपविभागात मात्र विद्यार्थी संख्या कमी असल्याने निधीही कमीच दिला गेला. जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ तालुक्यात १५ हजार ५२७, राळेगावमध्ये ७२०१, नेर ७५५६, कळंब ६९६३, घाटंजी १०८४४, दारव्हा १६६७६, बाभूळगाव ६४३८ आणि आर्णी तालुक्यात ११४४४ लाभार्थ्यांना या निधीचा लाभ होणार आहे. दरम्यान, बीपीएलवरील २९ हजार ८३७ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठीही आता निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे यापुढे सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जाणार आहे.
पुसद उपविभागातील लाभार्थी व निधी
तालुका : विद्यार्थी : निधी
पुसद : २२,९६१ : ३९,०३,३७०
उमरखेड : २३,०८९ : ३९,२५,१३०
महागाव : १८,३४७ : ३१,१८,९९०
दिग्रस : १०,१०१ : १७,१७,१७०
वणी उपविभागातील लाभार्थी व निधी
तालुका : विद्यार्थी : निधी
वणी : ९,९२२ : १६,८६,७४०
पांढरकवडा : ९,७८५ : १६,६३,४५०
झरी : ५,७३८ : ९,७५,४६०
मारेगाव : ५,२०३ : ८,८४,५१०