गणवेशासाठी मुलींचे माप महिलांच्या समक्ष घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 02:23 PM2020-03-09T14:23:35+5:302020-03-09T14:23:54+5:30
विद्यार्थिनींच्या गणवेशासाठी माप घेताना केवळ महिला शिवण कामगारच असावी, असे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत.
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शालेय विद्यार्थिनींना मोफत गणवेश दिला जातो. त्यासाठी गावातील टेलर मंडळीकडून विद्यार्थिनींचे माप घेतले जाते. मात्र, आता विद्यार्थिनींच्या गणवेशासाठी माप घेताना केवळ महिला शिवण कामगारच असावी, असे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत. शिवाय, असे माप घेताना गावातील प्रतिष्ठि महिला उपस्थित ठेवण्याचेही आदेश आहेत.
शालेय परिसरात महिला अत्याचाराच्या वाढत असलेल्या घटना बघता यंदा ही खबरदारी घेतली जात आहे. आगामी २०२०-२१ या शैक्षणिक सत्रातही समग्र शिक्षा अभियानातून मोफत गणवेश योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात थेट पैसे वळते केले जाणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत गणवेश देता यावा, यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने आतापासूनच तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात परिषदेचे सह संचालक राजेंद्र पवार यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ६ मार्चला लेखी आदेश दिला. शाळांनी चालू शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच गणवेशासाठी विद्यार्थ्यांची मापे घेण्याचे या आदेशात म्हटले आहे. मात्र त्यासाठी काही कठोर निर्बंधही घालण्यात आले आहे. त्यानुसार, विद्यार्थिनींचे माप हे महिला कारागिराकडूनच घेतले जावे, तिचे माप घेताना शाळा व्यवस्थापन समितीमधील महिला सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित महिला यांना उपस्थित ठेवण्याचे आदेश आहेत.
यंदा ज्याचा ड्रेस त्यालाच!
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश शिवायला टाकताना दरवर्षी एका जाड्याजुड्या विद्यार्थ्याचे माप घेतले जाते अन् सर्वांसाठी त्याच मापाचे ड्रेस शिवून आणले जातात. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना ढगळ शर्ट, काहींना आखूड पँट असे चित्र शाळांमध्ये पाहायला मिळते. मात्र यंदा शिक्षण परिषदेने प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतंत्र माप घेण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येकाचे माप घेतानाचा फोटो काढून ठेवावा लागणार आहे. तर मुलींसाठी त्यांच्या आवडीप्रमाणे सलवार, स्कर्ट, ब्लाउज, पिनो, कमिज, ओढणी अशा पद्धतीचा गणवेश द्यावा लागणार आहे. त्यानुसारच मापे घ्यावी लागणार आहेत.