१८ वर्षावरील युवांना मतदार यादीत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 09:33 PM2018-09-28T21:33:15+5:302018-09-28T21:34:31+5:30
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्यांमध्ये बदल, सूचना, नवमतदारांची नोंदणी आदी कामे सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्यांमध्ये बदल, सूचना, नवमतदारांची नोंदणी आदी कामे सुरू आहे. मतदानाच्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे तसेच १८ वर्षांवरील सर्वांची नावे मतदार यादीत समाविष्ट करावी, असे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी येथे सांगितले.
मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी आयुक्त बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सहायक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, स्वप्नील तांगडे, संदीप अपार, नितीन हिंगोले, स्वप्नील कापडनीस आदी उपस्थित होते.
१ जानेवारी २०१९ या दिनांकाला वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींना मतदार करणे आवश्यक आहे, असे सांगून विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आवश्यक त्या सूचना यावेळी केल्या. नवमतदार नोंदणीकरिता प्राचार्यांची बैठक बोलवावी, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीसुध्दा युवा मतदारांच्या नोंदणीसाठी पक्षाच्या युवा संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावे. आदिवासी भागातील मतदारांपर्यंत पोहचून त्यांची नावे यादीत समाविष्ठ करून घ्या आदी सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या. बैठकीला भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी म्हणून मनिष गंजीवाले, संजय धात्रक, शिवसेनेचे पराग पिंगळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. सचिन येरमे आदी उपस्थित होते.