तानाजींची जिल्ह्याला पुन्हा हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 09:58 PM2017-10-02T21:58:45+5:302017-10-02T21:59:03+5:30
विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी जिल्ह्याला सोमवारी पुन्हा एकदा हुलकावणी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी जिल्ह्याला सोमवारी पुन्हा एकदा हुलकावणी दिली.
विधान परिषदेच्या निकालानंतर तानाजी सावंत विमानाने येथून थेट ‘मातोश्री’वर आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते सुमारे वर्षभरापासून पुन्हा यवतमाळ जिल्ह्यात फिरकलेच नाही. अनेक कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा निमंत्रण पत्रिकेवर नामोल्लेख रहायचा. परंतु प्रत्येक वेळी आमदार सावंत यांची अनुपस्थिती राहिली आहे. सोमवारी पांढरकवडा येथे शिवसेनेने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पांढरकवडा नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने हा कार्यक्रम शिवसेनेसाठी महत्वाचा होता. मात्र या कार्यक्रमालाही आमदार सावंत उपस्थित राहिले नाही. त्यामुळे गाजावाजा करून कार्यक्रमाचे आयोजन करणाºया शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रचंड हिरमोड झाला. सततची अनुपस्थिती पाहता तानाजी शिवसेनेच्या येथील कारभारावर नाराज तर नाही ना, अशी शंका शिवसैनिकांमधूनच आता व्यक्त होऊ लागली आहे.
पांढरकवड्यातील शिवसेनेच्या या कार्यक्रमात खासदार भावनाताई गवळी यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. मुळात निमंत्रण पत्रिका अथवा सेनेने दिलेल्या जाहिरातींमध्ये त्यांचा नामोल्लेख नव्हता. हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ नाही, असा बचाव तेथील शिवसैनिक घेत असले तरी त्या जिल्ह्याच्या नेत्या आहेत याचा संबंधितांना विसर पडल्याचे दिसते.