टँकर वस्तीतून जातो, पण थांबत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 09:36 PM2018-04-05T21:36:44+5:302018-04-05T21:36:44+5:30

शहरात पाणी कुठेच नाही. नगरपरिषदेने टँकर लावून तात्पुरती तहान भागविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र व्यवस्थेतील कीडे हे पाणीही मधल्या मध्ये पळवून नेत आहे.

Tankers pass through, but do not stop | टँकर वस्तीतून जातो, पण थांबत नाही

टँकर वस्तीतून जातो, पण थांबत नाही

Next
ठळक मुद्देपिंपळगाव परिसर पाणी मागणाऱ्या मजुरांना दमदाटी, आम्ही माणसे नव्हे काय ?

रुपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात पाणी कुठेच नाही. नगरपरिषदेने टँकर लावून तात्पुरती तहान भागविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र व्यवस्थेतील कीडे हे पाणीही मधल्या मध्ये पळवून नेत आहे. पिंपळगाव परिसरातील काही वसाहतींमधून रोज टँकर जातो, पण थांबत नाही. लोकांनी टँकर थांबवून पाणी मागितले तर त्यांना पोलिसांकरवी दमदाटी करून हाकलून लावले जात आहे. या स्थितीने चिडलेल्या नागरिकांनी ‘आम्ही माणसे नव्हे का?’ असा संतप्त सवाल थेट जिल्हाधिकाºयांकडे उपस्थित केला आहे. टँकर मिळाला नाही तर अख्खी वसाहतच जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्कामाला येईल, असे रीतसर पत्र जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.
यवतमाळ नगरपरिषदेत नव्याने समाविष्ट झालेल्या पिंपळगावमधील विसावा कॉलनी, झोपडपट्टी वसाहतीसह प्रभाग चारमधील नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. या भागात पाण्याची तजवीज करण्यासाठी दोन टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी अर्धा ड्रम पाणी आले. यामुळे नागरिकांनी संताप नोंदविला. तेव्हापासून या भागातील काही लाईनला टँकरचे पाणी आलेच नाही. आता या भागातून टँकर जाताना दिसतात, मात्र ते काही लाईनमध्ये थांबत नाही. सगळे लोक त्याकडे भिरभिर नजरेने पाहतात. २२ दिवसांपासून नळ आला नाही. यामुळे घरातला प्रत्येक सदस्य रोज पाण्यासाठी हापशीवर जातो, असे लता भोंगे म्हणाल्या.
रात्री २ वाजतापर्यंत हापशीवर वर्दळ असते. दिवसभर काम केल्यानंतर रात्री पाणी भरावे लागते, असे शालिनी शेंडे म्हणाल्या. रात्री हापशीवर लाईटचीही व्यवस्था नाही. थंडाव्यात सापही असतात. घरातल्या चिल्यापिल्यांसह पाण्यासाठी धावपळ करावी लागते. बॅटरी घेऊन पाणी भरावे लागते, असे नलू पडोळे, अर्चना मडावी, वेणू बावनकर म्हणाल्या.
आम्ही महागडे पाणी विकत घेऊ शकत नाही. म्हणूनच नगरपरिषदेने पाण्याची मोफत व्यवस्था केली. पण आम्हाला त्या टँकरचे पाणी भेटले नाही. आम्ही रोज हापशीवरच पाणी भरतो. नगरसेविकेकडे वारंवार पाणी मागितले. आम्हाला पाणी भेटले नाही. पण पोलीस बोलावून हाकलून लावले. आम्हाला पाणी भेटणार नाही का? आम्ही रोजमजुरी करतो म्हणून आमचा पाण्याचा हक्क काढून घेतला का? आम्ही पाण्यासाठी कुठे जायचे, असे प्रश्न शुभम मामीडवार, अमोल चोले, राजेश ढेंगे, आकाश मेश्राम, प्रशांत इंगोले यांनी उपस्थित केले. रोजमजुरीत मिळवलेला सारा पैसा पाण्यासाठी खर्च करायचा का? मग खायचे काय? आम्ही अ‍ॅक्वाचे पाणी लावू शकत नाही. एकच हापशी आमच्या वाट्याला आहे. या भागातले लोक दररोज टँकरची वाट पाहतात. पण टँकर काही केल्या थांबत नाही. झोपडपट्टीत तर हा टँकर फिरकलाच नाही, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा कचेरीत ठोकणार मुक्काम
पाणीच नसल्याने आम्ही वैतागलो आहे. आता आमची क्षमता संपली आहे. ९ एप्रिलपर्यंत पाण्याचे टँकर सुरू झाले नाही, तर आम्ही लोक जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम ठोकणार आहे. तसे रितसर निवेदन जिल्हाधिकाºयांना दिल्याचे सचिन कदम, नितीन महल्ले आणि अरविंद मडावी यांनी सांगितले.
नगरसेविकेने भरला दम
या भागातील नागरिकांनी पाण्यासाठी नगरसेविकेला दूरध्वनी केला. टँकर कधी पाठविता, असे विचारले. मात्र त्यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. या भागातला टँकर अजिबात रोखायचा नाही, असा दम भरला. त्याचे मोबाईल रेकॉर्डिंग नागरिकांकडे आहे. या ध्वनीफितीसह जिल्हा प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे, संतप्त नागरिकांनी सांगितले.

Web Title: Tankers pass through, but do not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी