तंटामुक्त गावांचे पुन:सर्वेक्षण गरजेचे
By admin | Published: September 16, 2015 03:09 AM2015-09-16T03:09:01+5:302015-09-16T03:09:01+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व पोलीस विभागात समन्वयच नसल्यामुळे या समित्यांच्या स्थापनेचा मूळ हेतू यशस्वी होताना दिसत नाही.
नियंत्रण सुटले : अवैध व्यवसायाचे प्रस्थ प्रचंड वाढले
पुसद : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व पोलीस विभागात समन्वयच नसल्यामुळे या समित्यांच्या स्थापनेचा मूळ हेतू यशस्वी होताना दिसत नाही. या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटल्याने गावात अवैध व्यवसायाचे प्रस्थ फोफावले आहे. त्यामुळे किमान पुरस्कार प्राप्त गावांचे पुनर्सर्वेक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गावात उद्भवणाऱ्या लहानसहान तंट्यांचे दंगल व मोठ्या भांडणात रुपांतर होऊ नये, गावातील वाद गावातच सामंजस्याने सोडविले जावे, नागरिकांच्या वेळ व पैशाची बचत व्हावी, गावात सामाजिक सलोखा कायम राहून शांतता टिकावी यासाठी राज्याच्या गृह विभागाने पुढाकार घेऊन महात्मा गांधी तंटामुक्त योजना सुरू केली. या योजनेत तंटामुक्त गाव समिती व पोलिसांच्या सहकार्याने गावातील अवैध व्यवसायातील समुळ उच्चाटन करणे, गावात निवडणुका अविरोध होण्यासाठी प्रयत्न करणे गावातील शासकीय जागांवरील अतिक्रमण थांबविणे, तसेच गावात सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक एकता टिकून राहावी आदी कामांसाठी तंटामुक्त गाव समित्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीनुसार काम करणाऱ्या तंटामुक्त समित्यांना लोकसंख्येच्या निकषांवर पुरस्कारही देण्यात आले. पुरस्काराची राशी ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होताच तंटामुक्त समिती अध्यक्ष व निमंत्रकांचा ग्रामपंचायत कमिटीला विसर पडलेला दिसतो. त्यांना विश्वासात न घेताच सरपंच, सचिवांनी ठरवून दिलेले निकष धाब्यावर बसवून नियमबाह्य खर्च करणे सुरू केले आहे. या प्रकारामुळे तंटामुक्त समित्यांची गावातील पकड सैल झाली व गावात पुन्हा एकदा अवैध धंदे फोफाऊ लागल्याचे दिसून येते. गावागावात सट्टा व्यावसाय मोठ्या प्रमाणात आबाल-वृद्धांपासून पांढरपेशे व युवा वर्ग यामध्ये ओढल्या जात आहे. तंटामुक्त समित्या मात्र शांत दिसत आहेत. (तालुका प्रतिनिधी)