नळ आले की शिट्टी वाजते..!
By admin | Published: May 24, 2016 12:11 AM2016-05-24T00:11:18+5:302016-05-24T00:11:18+5:30
आज सगळीकडे पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले आहे. याला आपणच जबाबदार आहोत.
पाणी वाचविण्यासाठी अभिनव शक्कल
आर्णीच्या शाखा व्यवस्थापकाने शोधला उपाय
हरिओम बघेल आर्णी
आज सगळीकडे पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले आहे. याला आपणच जबाबदार आहोत. पाण्याची बचत कशी करता येईल, याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. अनेकदा गरज नसताना नळ सुरू राहतो. पाणी वाया जाते. आपल्या डोळ्यांना दिसूनही आपण नळ बंद करत नाही. ही बेफिकीरीच आज आपल्या अंगाशी आली आहे.
अनेकदा नळाला पाणी कधी आले, कधी गेले, हे आपल्याला माहिती पडत नाही. त्यामुळे विनाकारण बहुमूल्य पाणी वाया जाते. ही परिस्थिती सर्वच गावांमध्ये आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असते. मात्र ही बाब रोखण्यासाठी आर्णीत अभिवन उपाय शोधण्यात आला आहे.
आर्णी येथे गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची बिकट स्थिती आहे. नळ कधी येतील अन् कधी जातील याचा नेम राहिला नाही. वेळापत्रकच नाही. नळ आल्यानंतर नळाला लावलेले झाकन (कॅप) हवेच्या दाबाने फेकले जाऊन पाणी वाया जाते. त्यामुळे नळ कधीही येतील म्हणून महिला भर उन्हात ताटकळत उभे राहतात. ही बाब पाहून येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शहर शाखेचे व्यवस्थापक पनिधर भावराव आत्राम अस्वस्थ झाले. यावर त्यांनी एक सोपा उपाय शोधून काढला. नळला बसविलेल्या कॅपला त्यांनी एक शिट्टी बसविली. नळ येताना सुरुवातीला पाईपमधून जी हवा बाहेर फेकली जाते, त्याद्वारे शिट्टी वाजू लागते. नळाला पाणी आले हे नागरिकांना तातडीने कळते आणि पाणी वाया जाण्याचा धोका टळतो. शिवाय, नळ कधी येणार म्हणून उन्हात उभे राहून वाट पाहण्याचीही गरज उरली नाही.
शहरात आणि गावातही अनेकदा नळावाटे बरेच पाणी वाया जाते. नळ कधी आले हे कळत नसल्याने ही बाब घडते. मात्र नळाच्या कॅपला शिट्टी बसविल्याने आता आम्हाला नळ आला हे लगेच कळते. त्यामुळे पाणी वाया जात नाही.
- पनिधर आत्राम, आर्णी