मुलांच्या अॅडमिशनऐवजी घेतले नळ कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 10:34 PM2018-04-22T22:34:56+5:302018-04-22T22:34:56+5:30
लोहारा विभागातील पंचशीलनगर दलित वस्तीत पाण्याची भीषण टंचाई आहे. वर्षभरच या भागात पाण्यासाठी संघर्षाची स्थिती असते. उन्हाळ्यात या संकटाची भीषणता आणखीच वाढली आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांना पावसाळ्यात नळाचे नवीन कनेक्शन देण्यात आले.
रुपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोहारा विभागातील पंचशीलनगर दलित वस्तीत पाण्याची भीषण टंचाई आहे. वर्षभरच या भागात पाण्यासाठी संघर्षाची स्थिती असते. उन्हाळ्यात या संकटाची भीषणता आणखीच वाढली आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांना पावसाळ्यात नळाचे नवीन कनेक्शन देण्यात आले. त्याकरिता मोठी रक्कम मोजावी लागली. येथील लोकांनी मुलांची अॅडमिशन न करता नळाचे कनेक्शन घेतले. पण त्या नळाला थेंबभरही पाणी आले नाही.
पंचशीलनगरात पाण्याच्या व्यवस्थेकडे नगरपरिषदेचे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. टँकरची व्यवस्था झाली पण हे टँकर नऊ ते १० दिवसांनी येत आहे. मिळालेल्या टँकरमधून ड्रमभर पाणी येते. हे पाणी शेवाळलेले वास असलेले आहे. पण टंचाईकाळात नाईलाजाने ते भरून ठेवावे लागत आहे. या वसाहतीपासून जवळच औद्योगिक वसाहतीमधील गोखी पॉर्इंटचे पाणी आहे. हे पाणी शुद्ध आहे. त्या ठिकाणी दररोज टँकर जातात. मात्र आजपर्यंत हे शुद्ध पाणी पंचशीलनगरात आले नाही, असे जिजाबाई पुरी, पुष्पा भारसाकळे म्हणाल्या.
या भागात दोन हापशा आणि दोन विहिरी आहेत. या विहिरींची पाणीपातळी खोल गेली आहे. यामुळे या भागातील पाण्याची निर्भरता पूर्णत: टँकरवर आहे. टँकरचे पाणी पिण्यास योग्य नाही. यामुळे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. एका ड्रमसाठी १०० रूपये मोजावे लागतात, असे उषा मेश्राम, शांता पाल म्हणाल्या.
नळाचे कनेक्शन घेण्यासाठी ७ ते १० हजारांपर्यंत खर्च आला. मात्र या ठिकाणावरून गेलेल्या पाईपलाईनला नगरातील पाईपलाईनचे आजपर्यंत कनेक्शनच जोडले नाही. यामुळे या प्राधिकरणाचे पाणी अद्याप पोहोचले नाही. लोहारा विभागाचे नळ आहे. मात्र या नळाचे कुठलेही वेळापत्रक नाही. रात्री अपरात्री पाणी सोडले जाते. किमान वेळापत्रक तरी सुधारावे, असे वंदना जगताप म्हणाल्या.
आमच्या भागात पाण्याचा थेंब नाही. मात्र काही भागात सलग तीन दिवस नळ राहतात. त्याचा काय उपयोग? आम्हाला वाळीत टाकले काय? असा प्रश्नही या भागातील महिलांनी उपस्थित केला.
पाहुण्यांना थांबवले
यवतमाळ शहरातील पाणीटंचाई सगळ्यांनाच माहीत आहे. यामुळे यावर्षी आम्ही येणाऱ्या नातेवाईकांना न येण्याच्याच सूचना केल्या. मिळालेले पाणी काटकसरीने वापरावे लागत असल्याचे मतही अनेकांनी नोंदविले.
यवतमाळचे पाणी संसदेत
यवतमाळच्या पाण्याचा विषय लोकसभा आणि विधानसभेपर्यंत गेला. पण या भागात अजूनपर्यंत पाणी आले नाही. यानंतरही प्रशासनाच्या कामाची गती ढिम्म आहे, असे म्हणत नागरिकांनी चिंता व्यक्त केली.
दिवस बदलतील, असे वाटत नाही
पाणीटंचाईचा प्रश्न दरवर्षी असतो. यानंतरही आमच्या भागात पाण्याच्या ठोस उपाययोजना होत नाही. आमचे दिवस अजूनही बदलणार किंवा नाही, हे माहीत नाही. मात्र दूषित पाण्याने आमच्या भागात बिमाºया येण्याचा धोका असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले.