राळेगावात तूर खरेदी १५ दिवसांपासून बंद
By admin | Published: March 1, 2017 01:24 AM2017-03-01T01:24:21+5:302017-03-01T01:24:21+5:30
येथील बाजार समितीच्या यार्डवर १५ फेब्रुवारीपासून नाफेडची शासकीय तूर खरेदी बंद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांमध्ये चिंता : शेतमाल विकावा लागतोय व्यापाऱ्यांकडे
राळेगाव : येथील बाजार समितीच्या यार्डवर १५ फेब्रुवारीपासून नाफेडची शासकीय तूर खरेदी बंद करण्यात आली आहे. परिणामी शेतकऱ्यांना ३५०० ते ४००० रुपये प्रती क्विंटल दराने व्यापाऱ्यांना तूर विक्री करावी लागत आहे. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
शासनाचा तूर खरेदीचा हमीभाव ५०५० रुपये आहे. नाफेडव्दारे त्याच दराने खरेदी केली जात आहे. हमी दरापेक्षा कमी दरात होत असल्याची खरेदी एकीकडे शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. तर दुसरीकडे कायद्याचे उल्लंघन करणारीही आहे. विविध संकटांनी आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याऐवजी त्यांची संकट वाढतच चालली आहे.
बाजार समितीचे सचिव सुजीत चल्लावार यांनी नाफेडच्या यवतमाळ येथील अधिकाऱ्यांना तूर खरेदी संदर्भात विचारणा केली असता, यवतमाळ जिल्ह्यात सर्वच ठिकाणी नाफेडची तूर खरेदी बंद करण्यात आली आहे, ती परत सुरू करणे त्यांच्या अखत्यारीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने शेतकऱ्यांच्या या महत्वपूर्ण विषयावर वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करून तूर खरेदी त्वरित सुरू करावी यासाठी प्रयत्न करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. एकीकडे १५ मार्चपर्यंत ही तूर खरेदी सुरू ठेवण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत असताना, दुसरीकडे ही अव्यवस्था सुरू आहे. शेतकऱ्यांच्या असंतोषाचा स्फोट होऊन परिस्थिती चिघळण्यापूर्वी नाफेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तूर खरेदीसंदर्भात वास्तव भूमिका स्पष्ट करून दिलासा देण्याची व त्यांच्या होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षणाची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
आर्णी बाजार समितीत २००० क्विंटल तूर विक्रीच्या प्रतीक्षेत पडून
आर्णी : मागील १५ दिवसांपासून येथील शासकीय तूर खरेदी केंद्र बंद आहे. त्यामुळे जवळपास दोन हजार क्विंटल तूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ओट्यावर पडून आहे. उन्हामुळे दररोज तुरीचे वजन घटत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. आर्णी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कमीशन घेणाऱ्या खरेदी-विक्री संघाने प्रयत्न करून शासकीय खरेदी केंद्र सुरू ठेवणे अपेक्षित होते. मात्र यापैकी कुणीही पुढाकार घेतला नाही. बाजार समितीच्या एका संचालकाने हलकी तूर रात्रीच मोजून दिल्याने खरेदीवर परिणाम झाल्याचे सांगितले जाते. (तालुका प्रतिनिधी)