उद्दिष्ट लाखाचे अवघ्या 13 हजार नागरिकांनाच मिळाली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 05:00 AM2021-10-09T05:00:00+5:302021-10-09T05:00:25+5:30
राज्यातील अनेक जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे. मात्र, यवतमाळ जिल्हा तळाच्या पाच जिल्ह्यात आहे. मात्र, त्यानंतरही यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचेच पुन्हा पुढे आले. ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. या मोहिमेचा भाग म्हणूनच शुक्रवारी एकाच दिवशी एक लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, या अभियानाची पुरेशी माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही. पर्यायाने १३ हजार नागरिकांनाच लस मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लसीकरणात राज्याच्या तुलनेत जिल्हा पिछाडीवर आहे. त्यामुळेच या मोहिमेला गती देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी एकाच दिवशी एक लाख लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, नियोजनाचा अभाव तसेच नागरिकांपर्यंत योग्य प्रकारे माहितीच न पोहोचल्याने अवघ्या १३ हजार नागरिकांना लस मिळाली.
राज्यातील अनेक जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे. मात्र, यवतमाळ जिल्हा तळाच्या पाच जिल्ह्यात आहे. मात्र, त्यानंतरही यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचेच पुन्हा पुढे आले. ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. या मोहिमेचा भाग म्हणूनच शुक्रवारी एकाच दिवशी एक लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, या अभियानाची पुरेशी माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही. पर्यायाने १३ हजार नागरिकांनाच लस मिळाली.
दरम्यान, मोहिमेला गती देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, याशिवाय मोठे गाव, प्रभाग अशा ठिकाणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी सकाळपासून लसीकरणासाठी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जे गाव ९० टक्के लसीकरण पूर्ण करेल, अशा गावाला जिल्हा परिषद एक लाख रुपयाचा पुरस्कार देणार आहे. १६ तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची त्यासाठी निवड झाली आहे. एकापेक्षा जास्त गावे या कॅटेगिरीमध्ये आली, तर ईश्वर चिठ्ठी काढून पारितोषिक दिले जाणार असून सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडीताई, आशा यांचा गौरव केला जाणार आहे.
म्हणे, सोयाबीन, कापसामुळे लसीकरणाला अडथळा
मिशन कवच कुंडल सप्ताहाबाबत पुरेशी जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळेच शुक्रवारी ३०६ केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करूनही एक लाखाचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले. दरम्यान, गावामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, लसीकरणापासून वंचित राहिलेला मजूर वर्ग कापूस वेचण्यासाठी शेतात आहे. सोयाबीन काढणीचेही काम सुरू असल्याने मिशन कवच कुंडलला अडथळा निर्माण झाल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आता समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. दुर्गोत्सव मंडळ आणि इतर ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. येथे जास्तीत जास्त लसीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
लसीकरणासाठी यंत्रणेने सांघिक प्रयत्न करावा - विभागीय आयुक्त
विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी शुक्रवारी नियोजन भवनमध्ये महसूल व आरोग्य विभागाचा आढावा घेतला. जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण वाढविण्यासाठी महसूल व इतर सर्व विभागांनी मदत करावी. सांघिक प्रयत्नातूनच लसीकरण वाढेल, अशा सूचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे आदी उपस्थित होते. दरम्यान, आयुक्तांनी या बैठकीत शासकीय महसूल वसुली, रेतीघाट लिलाव सद्यस्थिती, जमीन महसूल अधिनियमाची अंमलबजावणी यासह इतर बाबींचा आढावा घेतला.