शेतात राबून शिकविले अन् घडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:20 AM2018-06-20T00:20:38+5:302018-06-20T00:20:38+5:30
शेतात राबून आईने शिकविले आणि मुलांनी तिच्या कष्टाचे चिज केले. पितृछत्र हरविल्याने आईवर येऊन पडलेल्या जबाबदारीचे भान राखत तिच्या आशा आकांक्षा पूर्ण केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शेतात राबून आईने शिकविले आणि मुलांनी तिच्या कष्टाचे चिज केले. पितृछत्र हरविल्याने आईवर येऊन पडलेल्या जबाबदारीचे भान राखत तिच्या आशा आकांक्षा पूर्ण केल्या. खंडाळा या छोट्याशा गावातील मायमाऊलीची तिनही मुले आज पोलीस विभागात कार्यरत आहे.
बेबीनंदा संजय कळंबे यांची ही गुणवान मुले आहेत. आपल्या संघर्षाची कथा सांगताना बेबीनंदा गहीवरून गेल्या. पतीचे १९ वर्षांपूर्वी निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. घरी चार एकर शेती असली तरी, लागवड खर्चही निघणार नाही एवढेच उत्पादन होत होते. तीन मुलांचे शिक्षण, घरखर्च करताना दमछाक होत होती. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शेतमजुरी केली. पोरांनीही जिद्दीने शिक्षण घेतले. आज मोठा मुलगा जितेश संजय कळंबे हा राखीव पोलीस दलात आहे. २०१४ मध्ये मुलगी लिना पोलीस विभागात रुजू झाली. सध्या ती लाडखेड येथे कार्यरत आहे. तिसरा मुलगा दिनेश याची नुकतीच पोलीस विभागात निवड झाली.
मोठा जितेश नोकरीला लागल्यापासून कुटुंबाला आधार झाला. दोन लहान भावंडांचे शिक्षण पूर्ण केले. वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाने लहान दोघांनीही त्याच्या पावलावर पाऊल ठेवत यश मिळविले. या तिनही मुलाचे प्राथमिक आणि बारावीपर्यंतचे शिक्षण वटफळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात झाले. परिस्थिती बेताची असली तरी खचून जाऊ नका, जिद्दीने सामना करा. मुलांना शिकवून घडवा, असे संदेश बेबीनंदा कळंबे देतात.