तवेराची मारूती कारला धडक, दोन गंभीर
By Admin | Published: December 24, 2015 03:09 AM2015-12-24T03:09:13+5:302015-12-24T03:09:13+5:30
भरधाव तवेराने मारूती कारला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले.
यवतमाळ : भरधाव तवेराने मारूती कारला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात यवतमाळ-आर्णी मार्गावरील मनदेव घाटात मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला.
रत्नाकर उर्फ रवी विश्वनाथ पुजारी (५०) रा. जिल्हा परिषद कॉलनी उमरखेड, शेषराव भगवान सोरते (५०) रा. उमरखेड अशी जखमींची नावे आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधीक्षक रवी पुजारी आपले मित्र शेषराव सोरते यांच्यासोबत मारुती कार क्र. एम.एच.१४-बी-११९७ ने मंगळवारी सायंकाळी उमरखेडकडे जात होते. मनदेव घाटात समोरुन येणाऱ्या तवेरा कार क्र. एम.एच.२७-एआर-४१७४ ने धडक दिली. धडक एवढी जबर होती की, मारूती कारचा चुराडा झाला. वाहन चालवित असलेल्या रवी पुजारी आणि शेषराव सोरते यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. त्याच वेळी या मार्गाने जाणारे जिल्हा परिषदेचे सदस्य मुन्ना पांढरे यांनी त्यांना जखमी अवस्थेत यवतमाळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. (प्रतिनिधी)