आचारसंहितेने पीककर्ज ‘ओटीएस’ अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 09:23 PM2019-03-13T21:23:30+5:302019-03-13T21:24:14+5:30
कर्जमाफी योजनेत दीड लाखांपेक्षा अधिक कर्जासाठी वनटाईम सेटलमेंट योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. प्रत्यक्षात कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. यामुळे ३१ मार्चपर्यंत वनटाईम सेटलमेंट योजना राबविणे अवघड बाब ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कर्जमाफी योजनेत दीड लाखांपेक्षा अधिक कर्जासाठी वनटाईम सेटलमेंट योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. प्रत्यक्षात कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. यामुळे ३१ मार्चपर्यंत वनटाईम सेटलमेंट योजना राबविणे अवघड बाब ठरणार आहे.
या स्थितीवर मात करण्यासाठी योजनेला मुदतवाढ गरजेची आहे. मात्र आचारसंहितेमुळे राज्य शासनाला निर्णयही घेता येणार नाही. या प्रकारात योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली. दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाºया शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी वनटाईम सेटलमेंट योजनेतून फायदा होणार आहे.
मुळात शेतकºयांकडे हजार रुपयांची रक्कम गोळा करण्यासाठी पैसा नाही. या स्थितीत अधिक रक्कम आणायची कुठून हा मूळ प्रश्न आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशा शेतकºयांचा आकडा जिल्ह्यात मोठा आहे. हे शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र असले तरी, शासकीय निकषांमुळे असे पात्र शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
जाचक अटींनी वंचितांची संख्या वाढली
कर्जमाफी योजनेत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. सोबतच जाचक अटी ठेवण्यात आल्या. यामुळे या योजनेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. आचारसंहितेमुळे मुदत संपणाऱ्या योजनेत अनेकांना पैशाअभावी सहभाग घेता येणार नाही. त्याला मुदतवाढ देण्याची प्रक्रियाही राबविता येणार नाही. यामुळे शेतकऱ्यांची दोन्ही बाजूने आर्थिक कोंडी होण्याचा धोका वाढला आहे.