आठ दिवसात तब्बल सहा लाखांचा कर जमा
By admin | Published: October 15, 2015 03:00 AM2015-10-15T03:00:31+5:302015-10-15T03:00:31+5:30
नगरपंचायतीची निवडणूक लागताच येथील नगरपंचायतीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. यापूर्वी कर वसुलीसाठी जंग-जंग
नगरपंचायतीला ‘अच्छे दिन’ : हवसे-गवसे-नवसे उमेदवार
मारेगाव : नगरपंचायतीची निवडणूक लागताच येथील नगरपंचायतीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. यापूर्वी कर वसुलीसाठी जंग-जंग पछाडणाऱ्या नगरपंचायतीला आठ दिवसांतच सहा लाखांचा कर प्राप्त झाला आहे.
येथील नगरपंचायतीची निवडणूक येत्या १ नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी उमेदवारी दाखल करायची शेवटची तारीख ८ आॅक्टोबर होती. प्रथमच शहरात होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत नगरसेवक बनण्याची अनेकांची सुप्त इच्छा आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी विविध पक्षांकडे उमेदवारी मागितली. राष्ट्रीय पक्षांनीही माणसे जोडून ठेवण्यासाठी उमेदवारी मागेल त्याला कामाला लागण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अनेकांनी आपली उमेदवारी पक्की समजून कागदापत्रांची जुळवाजुळव केली.
उमेदवारी कायम राखण्यासाठी घर कर थकित नसल्याची पावती आवश्यक होती. मात्र अनेक इच्छुक उमेदवारांनी घर बांधले तेव्हापासून कधीच कर भरला नव्हता. आता त्यांनी उम्ेदवारी अर्ज बाद होऊ नये म्हणून एका क्षणात कर भरून टाकला. यात अनेकांनी कर भरायला पैसे नसल्याने घरातील वस्तू गहाण ठेवून कर भरला. काहींनी उसणवार पैसे घेऊन कर जमा केला आहे. उमेदवारी दाखल केलेल्या १४५ उमेदवारांनी १ ते ८ आॅक्टोबर या कालावधीत तब्बल पाच लाख ६३ हजार रूपयांचा कर भरला आहे.
यापूर्वी अस्तित्वात असलेल्या येथील ग्रामपंचायतीने नागरिकांना कर भरण्यासाठी अनेकदा विनंती केली होती. तथापि, यातील बहूतांश नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या विनंतीकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीला कर गोळा करणे कठीण झाले होते.
आता मात्र विनासायास हा कर गोळा झाला आहे. विशेष म्हणजे कर भरणाऱ्या इच्छुक उमेदवारांपैकी आता बहुतांश जणांची उमेदवारी पक्षाने नाकारली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात या उत्साही उमेदवारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. (शहर प्रतिनिधी)