विदर्भाचा लेक IAS होणार, टॅक्सी चालकाच्या मुलाचे यूपीएससीत यश!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 02:18 AM2020-08-05T02:18:45+5:302020-08-05T02:19:15+5:30
गरिबीतून घेतले शिक्षण; यवतमाळच्या अझहर काझी यांची भरारी, जिल्ह्यातील तीन गुणवंत
अविनाश साबापुरे।
यवतमाळ : गरीब घरात गुणवत्ता जन्माला आली की, जिंकण्याची जिद्द अधिक धारदार बनते. कष्टाच्या पायऱ्या चढत यशाचा कळसही गाठता येतो. येथील काळीपिवळी टॅक्सी चालकाचा मुलगा अझहर काझी आता आयएएस अधिकारी होणार आहे. त्यांनी ३१५ वी रँक मिळविली. त्यांनी बँकिंग परीक्षांची तयारी केली. २०१२ मध्ये ते पीओ परीक्षा उत्तीर्ण होऊन कार्पोरेशन बँकेत लागले. बंगळूरू, नागपूर व यवतमाळ येथे शाखाप्रमुख म्हणून काम केले. २०१८ मध्ये त्यांनी नोकरी सोडून दिल्लीत जॅमिया हमदर्द युनिव्हर्सिटीत निवासी प्रशिक्षण अकादमीत प्रवेश घेतला. आता दुसºया प्रयत्नात ते यूपीएससीमध्ये यशस्वी झाले आहेत. वणीतील अभिनव इंगोले, सुमित रामटेके हे सुद्धा उत्तीर्ण झाले आहेत.
एसटी मेकॅनिकच्या मुलाने सर केले शिखर
उमरगा (जि़उस्मानाबाद) : एकूरगा येथील असित नामदेव कांबळे यांनी देशात ६५१ वा रँक मिळविला आहे. यावर्षीच मार्च महिन्यात त्यांनी भारतीय वनसेवा परीक्षेत देशात ६६ वा क्रमांक पटकाविला होता. त्यांचे वडील एसटीत मेकॅनिक आहेत.
मला यूपीएसीच्या मुलाखतीमध्ये यवतमाळचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अब्दूर रहमान आणि विद्यमान अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले. आयएएस होऊन समाजाची सेवा करावी, हे माझे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
- अझहर काझी, यवतमाळ
लहान भाऊही दिल्लीत
लहान भाऊ डॉ. उमेर काझी हेही दिल्लीत गेले आहे. यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये असलेली नोकरी सोडून ते यूपीएससीच्या तयारीसाठी फेब्रुवारी महिन्यात जॅमिया हमदर्द युनिव्हर्सिटीत गेले आहेत. तर आणखी एक लहान भाऊ जुबेर अभियंता, सर्वात लहान भाऊ अॅड. साकीब राजा वकिली करीत आहेत.
आईवडिलांना गगन ठेंगणे
प्रतिकूल परिस्थितीत अझहर यांचे भविष्य घडविणारे त्यांचे आईवडील मिराज आणि झहीरुद्दीन काझी यांच्या आनंदाला मंगळवारी पारावार राहिला नाही. केवळ दहावीपर्यंत शिकलेल्या या दाम्पत्याचा एक मुलगा आता आयएएस होणार आहे.
अंकिता वाकेकर एससी वर्गात राज्यात प्रथम
नाशिक : नाशिकची अंकिता अरविंद वाकेकर यांनी यूपीएससीमध्ये राज्यात मागासवर्गीय वर्गात अव्वल क्रमांक पटकावला आहे. देशात ५४७ वी रॅँक पटकावली. एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रात उपकार्यकारी अभियंता असलेले अरविंद व जिल्हा प्रशासनात नायब तहसीलदार असलेल्या संघमित्रा वाकेकर यांची कन्या असलेली अंकिता बालपणापासूनच हुशार विद्यार्थिनी आहे.