‘टीडीएस’ कपात बँकेला भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:35 PM2018-06-23T22:35:23+5:302018-06-23T22:35:40+5:30
ठेवीच्या रकमेतून ‘टीडीएस’ची परस्पर कपात महाराष्ट्र बँकेच्या वणी शाखेला भोवली. जिल्हा ग्राहक न्यायालयाने या बँकेला चपराक दिली आहे. वणी येथील मजूर महिलेने दाखल केलेल्या प्रकरणात मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य अॅड. आश्लेषा दिघाडे यांनी निर्णय दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ठेवीच्या रकमेतून ‘टीडीएस’ची परस्पर कपात महाराष्ट्र बँकेच्या वणी शाखेला भोवली. जिल्हा ग्राहक न्यायालयाने या बँकेला चपराक दिली आहे. वणी येथील मजूर महिलेने दाखल केलेल्या प्रकरणात मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य अॅड. आश्लेषा दिघाडे यांनी निर्णय दिला आहे.
वणी येथील सम्राट अशोक नगरातील रमा गौतम कांबळे यांनी बँक आॅफ महाराष्ट्रच्या वणी शाखेत मुलीच्या नावाने २ लाख रुपयाची गुंतवणूक केली होती. मुदतीअंती त्यांना तीन लाख ८१ हजार ११२ रुपये मिळणार होते. मात्र बँकेने ३ लाख १४ हजार २४९ रुपयेच रमा कांबळे यांच्या बँक खात्यात जमा केले. मुदती अंती मिळणारी पूर्ण रक्कम प्राप्त न झाल्याने त्यांनी बँकेशी संपर्क केला. त्यावेळी त्यांना १५ जी फॉर्म न भरल्याने दरवर्षी ‘टीडीएस’ची रक्कम कपात केल्याचे सांगण्यात आले.
फॉर्म भरण्याविषयी बँकेने कांबळे यांना कोणतीही माहिती दिली नाही. ६६ हजार ८६३ रुपये एवढी रक्कम कपात झाल्याने न्यायासाठी त्यांनी जिल्हा ग्राहक मंचायत धाव घेतली. बँकेतर्फे याप्रकरणात कुणीही हजर झाले नाही. त्यामुळे प्रकरण एकतर्फी चालविण्यात आले. रमा कांबळे यांची मुलगी अज्ञान आहे. तिच्या नावाने असलेल्या मुदत ठेवीच्या रकमेवर ‘टीडीएस’ची कपात उचित नाही व पूर्णपणे गैरकायदेशीर आहे असे मंचाने आदेशात म्हटले आहे. बँकेने कांबळे यांना ‘टीडीएस’ पोटी कपात केलेली रकम सव्याज द्यावी व मानसिक व शारीरिक त्रासापोटी दहा हजार रुपये व तक्रार खर्चाचे तीन हजार रुपये असा आदेश दिला आहे.