घरांच्या मोबदल्यातून टीडीएस कपात
By admin | Published: May 25, 2017 01:24 AM2017-05-25T01:24:20+5:302017-05-25T01:24:20+5:30
वेकोलिच्या कोलार पिंपरी विस्तारीत खुल्या कोळसा खाणीमध्ये अहेरी गाव अधिग्रहीत करण्यात आले.
अहेरीवासीयांनी धनादेश नाकारले : वेकोलिने घरे केली उद्ध्वस्त, गावकरी झाले बेघर
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वेकोलिच्या कोलार पिंपरी विस्तारीत खुल्या कोळसा खाणीमध्ये अहेरी गाव अधिग्रहीत करण्यात आले. गावकऱ्यांना त्यांच्या घराचा व खुल्या जागेचा मोबदला देताना त्यामधून १० ते २० टक्के आयकर कपात (टीडीएस) करण्यात आल्याने गावकरी वेकोलि प्रशासनावर संतप्त झाले. अखेर मंगळवारी होणारा धनादेश वितरणाचा सोहळा ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की वेकोलि प्रशासनावर आली. धनादेश वितरण कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनाही आल्यापावली भालरवरून परत जावे लागले.
वेकोलिच्या कोलार पिंपरी खुल्या कोळसा खाणीचे विस्तारीकरण करण्यात आले. या प्रकल्पामध्ये अहेरी गावठाणाच्या खाणी कोळसा असल्याने गावाचे पुनर्वसन होणे गरजेचे होते. वेकोलिने गावातील घरांचे व खुल्या जागेचे मुल्यांकन करून त्याच्या मोबदल्याचे धनादेश तयार केले. मात्र मोबदल्याच्या एकुण रकमेतून आयकर कपात करून धनादेश बनविण्यात आले. ज्या व्यक्तीकडे पॅनकार्ड असेल, त्यांची १० टक्के व पॅनकार्ड नसणाऱ्यांच्या रक्कमेतून २० टक्के कपात करण्यात आली. मंगळवारी या ३०० प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांच्या धनादेश वितरण सोहळा वेकोलिने आयोजित केला. कार्यक्रमाची संपूर्ण तयारीही करण्यात आली. धनादेश वितरणासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा हेसुद्धा भालर येथे पोहोचले. लाभार्थी अहेरी गाववासी धनादेश घेण्यासाठी हजर झाले. मात्र रकमेतून टीडीएस कापल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यामध्ये धुसपूस सुरू झाली. मिळणारा मोबदला हे उत्पन्न नसतानाही त्यावर आयकर लागतोच कसा? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उपविभागीय अधिकारी व वेकोलिच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन नियमांची पुन्हा पडताळणी करा व टीडीएस न कापता मोबदला देता येईल काय, याची खात्री करून धनादेश नव्याने तयार करा, त्यासाठी शेतकऱ्यांनी आणखी चार-सहा दिवस धीर धरावा, अशी विनंती आमदार बोदकुरवार यांनी केली. त्यामुळे धनादेश वितरणाचा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की वेकोलिवर आली.
आम्हाला निवारा द्या
घरांचा मोबदला देण्याआधीच वेकोलिने आमची घरे उद्ध्वस्त का केली? आता वेकोलिने आम्हाला निवाऱ्याची सोय करून द्यावी, पाण्यापावसाच्या दिवसात आम्ही मुलेबाळे कोठे ठेवावी? अशा प्रश्नांचा भडीमार प्रकल्पग्रस्तांकडून वेकोलि अधिकाऱ्यावर होत होता. वेकोलि अधिकाऱ्यांच्या मुजोरीपणाबद्दलही गावकऱ्यांकडून तक्रारी मांडण्यात आल्या. काही शेतकऱ्यांना शेताचा मोबदलाही अजून वेकोलिने दिला नसल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. मंगळवारी अहेरी गावच्या २९९ व्यक्तींना २० कोटी रूपयांचे वितरण केले जाणार होते. आता गावकऱ्यांना धनादेश कधी मिळणार? आयकर कपात न होता धनादेश मिळेल काय? याबाबत कुणीही अधिकारी काहीही बोलायला तयार नाही.