शिक्षक भरतीची अभियोग्यता परीक्षा एप्रिलमध्ये होणार, पोर्टलवर सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 01:27 PM2022-02-19T13:27:56+5:302022-02-19T13:35:56+5:30
आता शिक्षक भरतीसाठी २०१७ नंतर थेट २०२२ च्या एप्रिल महिन्यात परीक्षेचे आयोजन होणार आहे.
अविनाश साबापुरे
यवतमाळ : चार वर्षांपूर्वी पवित्र पोर्टलवरून सुरू झालेली शिक्षक भरतीची प्रक्रिया अर्धवट असतानाच आता भरतीसाठी दुसरी अभियोग्यता परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी एप्रिल महिन्यात परीक्षेचे आयोजन होणार असल्याची सूचना उमेदवारांना पवित्र पोर्टलवरच देण्यात आली आहे.
राज्यात २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ती बंदी २०१७ मध्ये उठविण्यात आली व डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. त्यात पावणेदोन लाख बीएड, डीएडधारकांनी आपली पात्रता सिद्ध केली. मात्र तब्बल दोन वर्षे भरती करण्यात आली नाही. नंतर २०१९ मध्ये मुलाखतीशिवाय नेमावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील साडेतीन हजार पदे भरण्यात आली. मात्र मुलाखतीसह खासगी संस्थांच्या शाळांमधील भरावयाच्या जागा अद्यापही भरण्यात आलेल्या नाही.
आता शिक्षक भरतीसाठी २०१७ नंतर थेट २०२२ च्या एप्रिल महिन्यात परीक्षेचे आयोजन होणार आहे. यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने फेब्रुवारी महिन्यातच अभियोग्यता परीक्षेचे आयोजन करण्याबाबत शिक्षण आयुक्तांना सूचना केली होती. मात्र टीईटी पेपरफुटी प्रकरणामुळे फेब्रुवारीचा मुहूर्त टळला.
खासगी संस्थांची कुचराई
खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मुलाखतीसह शिक्षकांची निवड करण्याची प्रक्रिया मध्यंतरी पवित्र पोर्टलद्वारे सुरू करण्यात आली होती. त्यासाठी २ सप्टेंबर २०२१ रोजी शिफारसपात्र उमेदवारांची नावे संस्थांना कळविली गेली. मात्र आजपर्यंत केवळ ३६२ संस्थांनी ७८९ उमेदवारांची निवड केल्याची नोंद पोर्टलवर केली आहे. प्रत्यक्षात शेकडो संस्थांमधील हजारो पदे रिक्त असून, त्या सर्वांना शिफारसपात्र उमेदवारांची नावे कळविली गेली होती.
अनेक दिवसांपासून भरतीप्रक्रिया सुरू आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे भरतीप्रक्रिया रखडत चालली आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढून उर्वरित भरतीप्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. तसेच नवीन अभियोग्यता परीक्षेचे वेळापत्रकही तातडीने जाहीर करावे.
- संतोष मगर, अध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन