यवतमाळ जिल्ह्यात मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:43 PM2018-04-09T13:43:01+5:302018-04-09T13:43:19+5:30

शिक्षक नेत्यासह मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून एका शिक्षकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना महागाव तालुक्यातील बेलदरी येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली.

Teacher committed suicide due to harassment of seniors in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यात मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यात मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देमहागाव तालुक्याच्या बेलदरीची घटनासात पानाच्या चिठ्ठीत शिक्षक नेता, मुख्याध्यापक आणि शिक्षकाचे नाव

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिक्षक नेत्यासह मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून एका शिक्षकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना महागाव तालुक्यातील बेलदरी येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. पुसद पंचायत समितीच्या काटखेडा शाळेत कार्यरत या शिक्षकाने मृत्युपूर्व सात पानाची चिठ्ठी लिहून जाच देणाऱ्या तिघांची नावे स्पष्टपणे नमूद केली आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
मनोहर वसंत जाधव (३७) रा. बेलदरी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते पुसद पंचायत समितीच्या काटखेडा शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत होते. रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांनी पत्नीला मोबाईल करून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. यामुळे घाबरलेल्या पत्नीने नातेवाईकांना माहिती दिली. त्यांचा शोध सुरू केला असता रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी आणि पाकीट शेतातील विहिरीजवळ आढळून आले. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रात्री शोध घेता आला नाही. या घटनेची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आली. दरम्यान सोमवारी सकाळी या विहिरीचे पाणी उपसल्यानंतर मनोहर जाधव यांचा मृतदेह आढळून आला. तसेच विहिरीवर ठेवलेल्या पाकीटात सात पानांची चिठ्ठी आढळून आली. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली.
मृत्युपूर्व चिठ्ठीत त्यांनी आपल्याला काटखेडा शाळेचे मुख्याध्यापक संतोष नारायण शेवाळकर, सहायक शिक्षक अश्विन शिवलाल चव्हाण आणि केंद्रांतर्गत मुंगसाजीनगर शाळेचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष राठोड यांच्या नावाचा उल्लेख आहे. या तिघांनी आपला मानसिक छळ केला. मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षक शाळेत शिकवत नव्हते. मुलांना साधी इंग्रजीही येत नाही, याबाबत आपण केंद्र प्रमुखांकडे तक्रार केली. तेव्हापासून आपल्याला मानसिक त्रास सुरू झाला. या दोघांना शिक्षक संघटनेच्या नेत्याने सहकार्य केले. आपले जीवन जगणे कठीण झाले, यामुळेच आपण आत्महत्या करीत असून आपल्याला आत्महत्येला केवळ तिघेच जबाबदार असल्याचे या चिठ्ठीत स्पष्टपणे नमूद केले आहे.
दरम्यान, नातेवाईकांच्या विनंतीवरून विहिरीजवळच सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान शवविच्छेदनास सुरुवात झाली. यावेळी परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी केली होती. सदर शिक्षकाच्या मागे पत्नी वर्षा, मुलगा, मुलगी आणि आई-वडील आहे.



मनोहर म्हणतो, हे कलियुग आहे, येथे चोर सोडून संन्याशालाच फाशी मिळणार
शिक्षक मनोहर जाधव यांनी आपल्या पत्नी वर्षाच्या नावे एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत त्यांनी तिला जीवनभर साथ देऊ शकलो नाही, याची खंत व्यक्त करीत ह्यहे कलियुग आहे, या युगात चोर सोडून संन्याशालाच फाशी मिळणार आहे असे लिहिले आहे. स्वत:चे जीवन ईश्वराला समर्पित करून जीवन जगण्याचा सल्ला देत सर्वांना सांभाळण्यासही या चिठ्ठीत त्यांनी सांगितले आहे. ईश्वराच्या न्यायालयात या लोकांना जरुर शिक्षा मिळेल, कारण तेथे पैसा, राजकीय संबंध चालत नाही, असेही म्हटले आहे.

Web Title: Teacher committed suicide due to harassment of seniors in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.