आमच्या भांडणाला हाच कारणीभूत.. पत्नीशी मोबाइल चॅटिंग करणाऱ्यावर शिक्षकाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 05:01 PM2022-02-18T17:01:19+5:302022-02-18T17:21:11+5:30
अंजनेय सोसायटी ही व्यक्ती आपल्या पत्नीशी मोबाइलवर चॅटिंग करते. त्यावरून भांडणे होतात, यामुळे संतापलेल्या पतीने सदर व्यक्तीचा शोध घेत त्याच्या घरी जाऊन राडा केला.
यवतमाळ : पत्नीशी सतत मोबाइल चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीचा शोध काढत किनवट येथील एक शिक्षक यवतमाळात पोहोचला. त्याने अंजनेय सोसायटीतील त्या व्यक्तीच्या घरी जावून राडा केला. झटापट केली व आपला संताप व्यक्त केला. याप्रकरणी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला. त्या शिक्षकाला अटकही केली.
जितेंद्र धोंदे (४०) रा. किनवट जि. नांदेड असे अटक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. जगदीश मेघराम जांगीड (४४) रा. अंजनेय सोसायटी ही व्यक्ती आपल्या पत्नीशी मोबाइलवर चॅटिंग करते. त्यावरून भांडणे होतात, यामुळे संतापलेल्या जितेंद्र धोंदे याने यवतमाळ गाठले. १० जानेवारीला सकाळी ८ वाजता धोंदे जगदीश जांगीड यांच्या घरी पोहोचला. तेथे त्याने तू माझ्या पत्नीला व्हॉटस्ॲपवर का बोलतो, असे विचारत धक्काबुक्की करणे सुरू केले. आरडाओरडा करून शिवीगाळ केली.
जांगीड यांना सोडविण्यासाठी त्यांची पत्नी धावून आली. तिलाही धोंदे याने हाताने ढकलून दिले. जांगीडकडील मोबाइल हिसकावून घेतला. ही झटापट झाल्यानंतर तो शिक्षक निघून गेला. याप्रकरणी जांगीड यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन अवधूतवाडी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पाेलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांनी शिक्षक जितेंद्र धोंदे याला किनवट येथून अटक केली. अधिक तपास सुरू आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मर्जीतील फिर्यादी
बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या जगदीश जांगीड यांच्या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या निर्देशावरूनच गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्या शिक्षकाच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पाेलीस तत्परतेने तपास करीत आहेत. या कारवाईबद्दल पोलीस वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.