शिक्षक चाबी विसरले, अन् विद्यार्थ्यांना सुटी मिळाली
By admin | Published: July 18, 2016 01:07 AM2016-07-18T01:07:20+5:302016-07-18T01:07:20+5:30
शिक्षक चाबी आणायचे विसरले अन् विद्यार्थ्यांना अघोषित सुटीच मिळाली. त्यातच मुख्याध्यापकही आले नाही.
शेंबाळपिंपरीचा प्रकार : मुख्याध्यापकानेही मारली बुट्टी
शेंबाळपिंपरी : शिक्षक चाबी आणायचे विसरले अन् विद्यार्थ्यांना अघोषित सुटीच मिळाली. त्यातच मुख्याध्यापकही आले नाही. हा संतापजनक प्रकार पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे शनिवारी घडला. सकाळच्या शाळेसाठी आलेले विद्यार्थी ज्ञानार्जनाशिवायच परत गेले.
शेंबाळपिंपरी येथे केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे १६५ विद्यार्थी शिक्षण घेतात. मुख्याध्यापकासह पाच शिक्षक कार्यरत आहे. त्यातील काही शिक्षक पुसद तर काही उमरखेडवरून जाणे येणे करतात. शुक्रवारी या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांंना चाबी देणे विसरले. मुख्याध्यापक शनिवारी काही कामानिमित्त शाळेत आले नाही. परिणामी शाळेला कुलूप होते. विद्यार्थी, शिक्षक गोळा झाले. परंतु शाळाच उघडली नव्हती. बराच वेळ प्रतीक्षा करून विद्यार्थी घराकडे निघून गेले. तर शिक्षक त्याच ठिकाणी ताटकळत थांबले.
येथील शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक कधीच वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे शाळा उशिरा उघडण्याचे प्रकार नेहमीच घडतात. परंतु शनिवारी चक्क सुटीच द्यावी लागली.
हा प्रकार माहीत होताच सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शाळेत पोहोचले. मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. काही वेळानंतर केंद्र प्रमुख या ठिकाणी पोहोचले. मात्र मुख्याध्याप आलेच नाही. या प्रकाराबद्दल गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे. (वार्ताहर)