तरोडा येथील शाळेत विद्यार्थ्यांना यू-ट्यूब चॅनलद्वारे शिक्षण- नेटवर्कच्या समस्येवर मात करण्यासाठी शिक्षक गणेश राऊत यांचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:28 AM2021-07-02T04:28:22+5:302021-07-02T04:28:22+5:30
मुकेश इंगोले दारव्हा : नेटवर्कअभावी ऑनलाईन वर्ग घेताना निर्माण होणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी एका शिक्षकाने यू-ट्यूब चॅनल सुरू केले. ...
मुकेश इंगोले
दारव्हा : नेटवर्कअभावी ऑनलाईन वर्ग घेताना निर्माण होणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी एका शिक्षकाने यू-ट्यूब चॅनल सुरू केले. यामुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली. हा प्रयोग यशस्वी झाल्याने इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
तालुक्यातील तरोडा येथील जिल्हा परिषद डिजिटल मराठी शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक गणेश राऊत यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नामुळे आता नेटवर्कची समस्या किंवा अँड्रॉइड मोबाईल नसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले. कोरोनाच्या भीतीमुळे दोन शैक्षणिक सत्रांपासून शाळा बंद आहे. त्यामुळे ऑनलाईन वर्ग घेतले जात आहे. परंतु या आधुनिक शिक्षण पध्दतीचा अवलंब करताना ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ऑनलाईन वर्गासाठी लागणारे महागडे अँड्रॉइड मोबाईल, दर महिन्याचा रिचार्जचा खर्च काहींना झेपत नाही. काही घरात मोबाईल एक, परंतु विद्यार्थी जास्त, अशी स्थिती आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेकदा नेटवर्क मिळत नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. ही बाब लक्षात घेत गणेश राऊत यांनी यू-ट्यूब चॅनल सुरू केले. यामुळे आता व्हिडिओ डाऊनलोड करून ऑफलाईन क्लास अटेंड करणे तसेच काही अडचणींमुळे ऑनलाईन क्लास वेळेवर जॉईन करता येणार नाही, त्यांनी त्यांच्या सवडीनुसार जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या यू-ट्यूब चॅनलवरील व्हिडिओ बघून केव्हाही अभ्यास करणे शक्य झाले आहे.
ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाही, त्यांनासुद्धा शिक्षण घेता येईल. अँड्रॉइड मोबाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास झाल्यानंतर मित्राला यू-ट्यूबवरील व्हिडीओ दाखवून अभ्यासाकरिता मदत करायची, यासाठी ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ हा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना केव्हाही आणि कुठेही अभ्यास करण्यासाठी पॉकेट एज्युकेशन एनीटाईम, एनीव्हेअर या उद्देशाने यू-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे.
बॉक्स
विद्यार्थ्यांचे सत्र वाया जाणार नाही
पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विलास जाधव यांच्याहस्ते यू-ट्यूब चॅनलचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र वाया जाऊ नये म्हणून ऑनलाईन वर्गाचा मार्ग काढण्यात आला. परंतु नेटवर्कची समस्या निर्माण झाली. गणेश राऊत यांनी ऑनलाईन वर्गातील हा अडथळा दूर करण्यासाठी चांगला उपक्रम सुरू केला आणि तो यशस्वी ठरत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.