सेवानिवृत्तीच्या दोन दिवसांपूर्वी मिळाली शिक्षकाला बढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 05:00 AM2022-04-02T05:00:00+5:302022-04-02T05:00:01+5:30
लोणबेहळ जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र जोगमोडे हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागने २५ मार्च बढती दिली. त्यामुळे ते केवळ दोन दिवसांसाठी मुख्याध्यापक झाले. जिल्हा परिषदेने तब्बल २०० शिक्षकांच्या बढतीचे आदेश २९ मार्चला निर्गमित केले. २१ मार्चला पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपताच प्रशासक राज सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांना त्यांच्या हक्काची बढती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आर्णी तालुक्यातील लोणबेहळ जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकांना निवृत्तीच्या केवळ दोन दिवस आधी मुख्याध्यापकपदी बढती मिळाली. त्यामुळे ते केवळ दोन दिवसांचे मुख्याध्यापक ठरले. अगदी नायक सिनेमातील हा प्रकार जिल्हा परिषदेने प्रत्यक्षात आणला.
लोणबेहळ जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र जोगमोडे हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागने २५ मार्च बढती दिली. त्यामुळे ते केवळ दोन दिवसांसाठी मुख्याध्यापक झाले. जिल्हा परिषदेने तब्बल २०० शिक्षकांच्या बढतीचे आदेश २९ मार्चला निर्गमित केले. २१ मार्चला पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपताच प्रशासक राज सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांना त्यांच्या हक्काची बढती दिली.
२०१७ पासून शिक्षकांच्या बढत्या रखडल्या होत्या. गेल्या पाच वर्षांपासून विविध शिक्षक संघटना प्रमोशनसाठी प्रयत्नरत होत्या. मात्र, कायद्याचा आधार घेत उणीवा काढून आडकाठी निर्माण केली जात होती. अनेक शिक्षक तर बढती न मिळताच सेवानिवृत्त झाले. त्यामुळे प्रशासक राज सुरू होताच पुन्हा एकदा शिक्षकांच्या प्रमोशनचा मुद्दा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे मांडण्यात आला. त्यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांना कार्यवाहीचे आदेश दिले. शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी संपूर्ण कागदपत्रे तयार करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. नंतर अवघ्या पाच दिवसांत १९४ प्राथमिक शिक्षक, १७ माध्यमिक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी बढती देण्यात आली. यापैकी अनेकांची सेवानिवृत्ती काही महिन्यांच्या उंबरठ्यावर आली आहे.
शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पदेही भरली
- माध्यमिकचे चार पर्यवेक्षक, माध्यमिकचे एक उपमुख्याध्यापक, तसेच प्राथमिकच्या १४ शिक्षकांना शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागल्याने शिक्षकांनी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आभार मानले. शिक्षकांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याबद्दल शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी सीईओंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.