शिक्षकांचा विद्यार्थी हिताला खो
By admin | Published: July 17, 2014 12:22 AM2014-07-17T00:22:15+5:302014-07-17T00:22:15+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात पुढे जावा यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात असले तरी, त्याला शिक्षकांकडूनच मूठमाती मिळत आहे. जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या उपक्रमांकडे
राळेगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात पुढे जावा यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात असले तरी, त्याला शिक्षकांकडूनच मूठमाती मिळत आहे. जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या उपक्रमांकडे या शिक्षकांनी पाठ फिरविल्याचे वास्तव आहे. ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत घेतलेल्या आढाव्यात ही बाब स्पष्ट झाली आहे. राळेगाव तालुक्यात महत्त्वपूर्ण योजना राबविल्या गेल्या नसल्याची बाबही पुढे आली आहे.
सदर उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पंचायत समितीला भेट देवून विविध विभागाच्या कामाचा आढावा घेतला. काही विभागाने अनेक महत्त्वाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या नसल्याची बाब पुढे आली आहे. येथून अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी वाटखेड, सावनेर, रावेरी येथील शाळांना भेट दिली. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य होती. अनेक विद्यार्थी इंग्रजी आणि गणित विषयात माघारल्याचे आढळले.
जिल्हा परिषदेने शिक्षकांसाठी ‘एक दिवस गावाकरिता’ हा उपक्रम हाती घेतला. प्रत्येक शुक्रवारी शिक्षकाने मुख्यालयी राहून किमान तीन ते चार विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट घ्यावी, त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक बाबींची विचारपूस करावी, असा हा उपक्रम आहे. मात्र याकडे बहुतांश शिक्षकांनी पाठ फिरविल्याचे तपासणीत दिसून आले. शालेय पोषण आहाराबाबतही शिक्षक फारसे गंभीर नसल्याचे लक्षात आले.
वाढोणाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कर्तव्यात कसूर सोडत असल्याची बाब दिसून आली. पंचायत विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांतर्गत ६७१ घरकुलं अपूर्ण असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. येवती येथील प्राथमिक उपकेंद्राची इमारत जागेअभावी बांधली गेली नाही, जलपूर्ती योजनेचे दोन कोटी रुपये शिल्लक असल्याचे तपासणीत आढळून आले.
विविध योजनांतर्गत शौचालय बांधकामाची रक्कम लाभार्थ्यांना देण्यात आली नाही. समाज कल्याण विभागातून पुरविले जाणारे साहित्य धूळ खात पडून होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी याबाबत असमाधान व्यक्त करत वस्तूंचे वाटप निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांना तत्काळ करण्याच्या सूचना केल्या. बांधकाम विभागाच्या अनेक तक्रारी त्यांच्या निदर्शनास आल्या. त्याचे निरसन करावे, असे आदेश त्यांनी दिले.
आढावा बैठकीला अध्यक्ष प्रवीण देशमुख, उपाध्यक्ष ययाती नाईक, बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे, पंचायत समिती सभापती अशोक केवटे, उपसभापती नलिनी पराते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, डॉ. प्रशांत रूमाले, कृषी विभागाचे जगन राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मीक इंगोले, पंचायत समिती सदस्य सुरेश मेश्राम, बेबीताई जवादे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, गटशिक्षणाधिकारी नभा सिंगलवार यांच्यासह तालुक्यातील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)