शिक्षक भरती ऑगस्टमध्ये! संचमान्यता अंतिम झाल्यानंतर पवित्र पोर्टल होणार ॲक्टिव्ह

By अविनाश साबापुरे | Published: May 8, 2023 05:44 AM2023-05-08T05:44:34+5:302023-05-08T05:44:52+5:30

तब्बल अडीच लाख बेरोजगार उमेदवारांना प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरतीचा मुहूर्त येत्या ऑगस्ट महिन्यात निघाला आहे.

Teacher recruitment in August Holy portal will be active after final approval | शिक्षक भरती ऑगस्टमध्ये! संचमान्यता अंतिम झाल्यानंतर पवित्र पोर्टल होणार ॲक्टिव्ह

शिक्षक भरती ऑगस्टमध्ये! संचमान्यता अंतिम झाल्यानंतर पवित्र पोर्टल होणार ॲक्टिव्ह

googlenewsNext

अविनाश साबापुरे

यवतमाळ : तब्बल अडीच लाख बेरोजगार उमेदवारांना प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरतीचा मुहूर्त येत्या ऑगस्ट महिन्यात निघाला आहे. सध्या कार्यरत शिक्षकांची संचमान्यता १५ मेपर्यंत पूर्ण करून त्यानंतर नव्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ॲक्टिव्ह करण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शालेय शिक्षण विभागाला कळविले आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. २४ मार्च रोजी या परीक्षेतील दोन लाख ४० हजार डीएड, बीएडधारकांचा निकालही जाहीर करण्यात आला.

मात्र, दोन महिने उलटूनही शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या हालचाली नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याच दरम्यान उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे शासनाला पदभरतीचे वेगवान नियोजन करणे भाग पडले आहे.

पदभरतीची कार्यवाही आवश्यक

शिक्षण संचालक गोसावी यांनी भरतीचे वेळापत्रकच प्रधान सचिवांना कळविले आहे. त्यात १७ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार टेट परीक्षेच्या निकालानंतरची पदभरतीची कार्यवाही सुरू करणे आवश्यक असल्याची बाब प्रधान सचिवांच्या निदर्शनात आणून देण्यात आली आहे.

 परंतु सध्या विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशननुसारच शिक्षकांची २०२२-२३ ची संचमान्यता करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांचे चित्र स्पष्ट होईल व त्यानंतरच नव्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

असे असतील भरतीचे टप्पे

कार्यरत शिक्षकांची संचमान्यता १५ मेपर्यंत अंतिम करणे

२० मेपर्यंत शाळानिहाय अंतिम संचमान्यता वितरित होतील

या संचमान्यतेतील मंजूर पदानुसार पदभरतीची कार्यवाही सुरू होणार

व्यवस्थापनांच्या शिक्षक पदांची बिंदुनामावली ३० जूनपर्यंत प्रमाणित करणे

संबंधित व्यवस्थापनाच्या रिक्त पदांची जाहिरात १५ जुलैपर्यंत पवित्र पोर्टलवर दिली जाईल

२० ऑगस्टपर्यंत उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे

दरम्यानच्या काळातच दुसऱ्या तिमाहीकरिता शिक्षकांच्या रिक्त पदांची पोर्टलवर नाेंद करणे

बदल्यांवरील स्थगितीमुळे शिक्षक राहणार मूळ शाळेतच

प्राथमिक शाळा शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमधील ज्यांच्या बदल्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, अशांना सध्या तरी मूळ शाळेवरून मुक्त करू नका, असा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागातील उपसचिव पो. द. देशमुख यांनी सर्व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला.

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या सहाव्या फेरीतील बदल्यांना काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाने बदल्यांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता, त्यानुसार या याचिकांवर जूनच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. वयाच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी ३० जून २०२२ अशी डेडलाइन ग्राह्य धरण्यात आल्याने ही नवी समस्या पुढे आली. याशिवाय अतिदुर्गम भागात बदली झालेल्यांमध्ये १५३ शिक्षिकांचा समावेश आहे. त्यामुळे या बदल्यांना स्थगितीची मागणी करत सुमारे २०० शिक्षकांनी  कोर्टात आव्हान दिले आहे.

Web Title: Teacher recruitment in August Holy portal will be active after final approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.