‘सीसीटीव्ही’साठी शिक्षकांचा पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:19 PM2018-05-25T22:19:39+5:302018-05-25T22:19:39+5:30

Teacher salary for 'CCTV' | ‘सीसीटीव्ही’साठी शिक्षकांचा पगार

‘सीसीटीव्ही’साठी शिक्षकांचा पगार

Next
ठळक मुद्देविवेकानंद विद्यालय : वर्षभर अर्धा टक्के कपात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नितीमूल्य जोपासण्याची बाता करणाऱ्या येथील विवेकानंद विद्यालय संस्थेनेच ही मूल्ये पायदळी तुडविली आहे. शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी चक्क कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच रक्कम कपात केली आहे. ३२ कर्मचाऱ्यांच्या पगारातून ८१ हजार ७३५ रुपये या विद्यालयाने कपात करून आर्थिक पिळवणूक केली आहे.
शिक्षण महर्षी बाबाजी दाते यांनी स्थापन केलेल्या विशुद्ध विद्यालय यवतमाळद्वारा संचालित विवेकानंद विद्यालय आहे. शाळा, महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा फतवा शासनाने काढल्यानंतर या शाळेच्या प्रशासनाची कर्मचाºयांच्या पगारावर वक्रदृष्टी पडली. कपात केलेल्या रकमेतून २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.
शासनाने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी करताना शाळेने पगार कपातीसाठी यादीच तयार केली. एकूण ३२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करताना वार्षिक वेतनाचा आधार घेण्यात आला. अर्धा टक्के याप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचारी ते वरिष्ठ शिक्षकांच्या वेतनातून १२०० ते ३८०० रुपयांपर्यंत रक्कम शाळेने कापली. वास्तविक हा खर्च शाळेने करणे अपेक्षित होते. मात्र शिक्षक, कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात आले. संस्थेंतर्गत चालणाºया इतर शाखांमध्येही असाच प्रकार झाला असल्याची साधार शंका व्यक्त केली जात आहे. नोकरीच्या भीतीपोटी कुठलाही कर्मचारी पुढे येण्यास तयार नाही. मात्र कुठेतरी याची वाच्यता होत आहे. संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांनी संगनमत करून शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रक्कम कापली. या प्रकाराविषयी सखोल चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. यासाठी लोकसहभाग घेण्यात आला. कर्मचारी किंवा शिक्षकांच्या वेतनातून कुठलीही रक्कम कपात केली नाही.
- मोहन केळापुरे, मुख्याध्यापक, विवेकानंद विद्यालय, यवतमाळ

Web Title: Teacher salary for 'CCTV'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.