शिक्षक प्रशिक्षणाच्या निधीचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 10:06 PM2018-03-04T22:06:00+5:302018-03-04T22:06:00+5:30
शिक्षक प्रशिक्षणाच्या नावाखाली शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा केला जात आहे. प्रशिक्षणार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा न करताच अवाढव्य खर्च दाखविण्यात येत आहे.
किशोर वंजारी ।
ऑनलाईन लोकमत
नेर : शिक्षक प्रशिक्षणाच्या नावाखाली शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा केला जात आहे. प्रशिक्षणार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा न करताच अवाढव्य खर्च दाखविण्यात येत आहे. भोजनासाठी ३०० रुपये प्रती प्रशिक्षणार्थी मिळत असताना अतिशय निकृष्ट भोजन त्यांना दिले गेले. याशिवाय इतर बाबतीतही सुविधांची बोंबाबोंब होती.
पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी संख्याज्ञान व संख्येवरील क्रियासंबोध विकसन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम येथे घेण्यात आला. तीन-तीन दिवसांच्या या प्रशिक्षणात प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाला प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी संबंधित प्रशासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आला. दर्जेदार भोजन, सर्वसोयीयुक्त हॉल राहील एवढा निधी दिला गेला. नेर तालुक्यासाठी एक लाख ६२ हजार २०० रुपये प्राप्त झाले. तीन दिवस झालेल्या प्रशिक्षणात १७१ शिक्षक सहभागी झाल्याचे दाखविण्यात आले.
एका प्रशिक्षणार्थी शिक्षकाच्या भोजनासाठी ३०० रुपये खर्चाची सूचना होती. प्रत्यक्षात निकृष्ट भोजन देण्यात आले. प्रशिक्षण सरकारी शाळेतील एका लहानशा खोलीत घेण्यात आले. शिवाय प्रवासभत्ताही देण्यात आला नाही. प्रशिक्षणाच्याा ठिकाणी एलसीडी प्रोजेक्टरही लावण्यात आले नाही. बैठक व्यवस्था चादरीवर होती. कुठल्याही सुविधा पुरविलेल्या नसताना १ लाख ६२ हजाराचा खर्च कुठे करण्यात आला हा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे. शालेय पुस्तके शाळेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी इतरांची असताना हे काम शिक्षकांनाच करावे लागले. स्वत:च्या खिशाला कात्री लागली. नेर येथील शिवाजी हायस्कूलमधून पुस्तकांचे गठ्ठे शिक्षकांनाच न्यावे लागले. यासंपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी आहे.