गुरुजी प्रशिक्षणाला, शाळेला कुलूप
By admin | Published: July 12, 2014 11:56 PM2014-07-12T23:56:24+5:302014-07-12T23:56:24+5:30
येथून जवळच असलेल्या जवराळा या गावातील जिल्हा परिषद शाळेचे एकमेव शिक्षक गेल्या दहा दिवसांपासून प्रशिक्षणाला गेले आहे. त्यामुळे शाळेला कुलूप आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहे.
बिटरगाव : येथून जवळच असलेल्या जवराळा या गावातील जिल्हा परिषद शाळेचे एकमेव शिक्षक गेल्या दहा दिवसांपासून प्रशिक्षणाला गेले आहे. त्यामुळे शाळेला कुलूप आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहे.
कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची व्यवस्था व्हावी, यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च शासन करते. परंतु नियोजनाचा अभाव व अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांची उदासीनता यामुळे शासनाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासल्या जात आहे. पैनगंगेच्या किनाऱ्यावरील घनदाट अभयारण्यात जवराळा या एक हजार लोकवस्तीच्या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. तेथे एक ते पाच वर्ग आहेत. परंतु या पाचही वर्गावर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केवळ एकच गुरुजी आहे. गेल्या दहा दिवसांपासून हे गुरुजीसुद्धा प्रशिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळे शाळेला कुलुप आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या अशा कारभारामुळे देशातील भावी पीढिचे भविष्य अंधकारमय झाले आहे. पायाभरणीच कमी असेल तर विद्यार्थ्यांच्या मनात पुढे शिक्षणाची आवड कशी निर्माण होईल. एकीकडे विद्यार्थी शाळेत यावे, पटसंख्या कमी होऊ नये म्हणून शासन प्रयत्न करीत असते. परंतु येथे मात्र विद्यार्थी आहेत पण गुरुजीच नसल्याने पालकवर्ग त्रस्त आहेत. या गावाला आजपर्यंत कधी एसटीचे दर्शनच झाले नाही. तालुक्याला जाण्यासाठी ५० ते ६० किलोमीटरचा प्रवास दराटीला जाऊन बस गाठून करावा लागतो.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून पटसंख्येनुसार शिक्षक देण्यात यावे, अन्यथा शाळा बंद करू, असा इशारा पोलीस पाटील विजय घुले, विजय जाधव, संतोष घुले व अनिल जाधव यांच्यासह गावातील नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)