मेटीखेडा येथील केंद्रशाळेला शिक्षक तुटवड्याचे ग्रहण
By admin | Published: July 17, 2017 01:49 AM2017-07-17T01:49:30+5:302017-07-17T01:49:30+5:30
मेटीखेडा केंद्र शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. आवश्यक तेवढे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे कठीण झाले आहे.
पाच वर्ग : १२३ विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक, शिक्षणाचा खेळखंडोबा
निश्चल गौर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरखर्डा : मेटीखेडा केंद्र शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. आवश्यक तेवढे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे कठीण झाले आहे. आधीच अपुरे शिक्षक आणि त्यातच प्रशासनातील कामे वाढली आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे.
मेटीखेडा केंद्र शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत. पहिला आणि पाचवा वर्ग सेमी इंग्लिश आहे. या शाळेची पटसंख्या १२३ एवढी आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केवळ तीन शिक्षक कार्यरत आहे. त्यातही मुख्याध्यापकांना मध्यान्ह भोजन, मतदार याद्या यासोबतच अनेक प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागत आहे.
या शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला असल्याने सतत तीन वर्षांपासून पटसंख्याही वाढत आहे. पुणे येथील शाळा सिद्धी बाह्य मूल्यमापन विद्या प्राधिकरणाने या शाळेला भेट दिली होती. शाळेचा झालेला विकास पाहून शाळा सिद्धीचा अ श्रेणी दर्जाही या शाळेला बहाल करण्यात आला. आता मात्र शिक्षकांचा तुटवडा असल्याने दर्जा घसरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील अनेक शाळांमध्ये नगण्य पटसंख्या आहे. तरीही दोन शिक्षक त्याठिकाणी कार्यरत आहेत. मेटीखेडा केंद्र शाळेत आवश्यकता असतानाही शिक्षक उपलब्ध करून देण्यास चालढकल सुरू आहे. कळंब पंचायत समिती शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष सुरू असल्याचा आरोप पालकांमधून होत आहे.