शिक्षक दिनावर बहिष्काराचे मळभ; महत्त्वाच्या संघटना उतरल्या मैदानात, अशैक्षणिक कामांचा जोरदार विरोध
By अविनाश साबापुरे | Published: September 3, 2023 08:17 PM2023-09-03T20:17:32+5:302023-09-03T20:18:05+5:30
...नेमक्या याच बाबीवरून जिल्ह्यातील महत्त्वाच्या शिक्षक संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
यवतमाळ : शिक्षण क्षेत्रातील उत्तम कार्याचा सन्मान म्हणून ५ सप्टेंबर रोजी शासनामार्फत शिक्षक दिन साजरा होत आहे. मात्र विविध कारणांनी अस्वस्थ असलेल्या शिक्षकांनी या आनंदाच्या दिवसालाच शासनाविरुद्ध आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे यंदाच्या शिक्षक दिनावर बहिष्काराचे मळभ दाटले आहे. वर्षभर शिक्षकांना सतत अशैक्षणिक कामात गुंतवून ठेवायचे आणि शिक्षक दिनी केवळ एका दिवसासाठी त्यांचे तोंडदेखले कौतुक करायचे, असा पवित्रा शासनाने घेतला आहे.
नेमक्या याच बाबीवरून जिल्ह्यातील महत्त्वाच्या शिक्षक संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यात सर्वात ऐरणीवर आहे नवभारत साक्षरता कार्यक्रमाची सक्ती. हे सर्वेक्षण आमच्याकडून काढून घ्यावे, अशी सातत्याने मागणी करूनही शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक संघटना शासनाचा कडवा विरोध नोंदविणार आहे.
शिक्षक समितीचे सामूहिक रजा आंदोलन
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षक दिनीच सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. याबाबत थेट संचालकांपर्यंत पत्र देण्यात आले आहे. समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे व राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. सर्व शिक्षकांनी ५ सप्टेंबरच्या सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार, सरचिटणीस संदीप मोहाडे, जिल्हा नेते ज्ञानेश्वर नाकाडे, गजानन देऊळकर, कार्याध्यक्ष रविंद्र उमाटे, किशोर सरोदे, प्रफुल्ल फुंडकर, महेश सोनेकर, ओमप्रकाश पिंपळकर आदींनी केले.
शिक्षक संघ लावणार काळ्या फिती
अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय बैठकीत निषेध आंदोलनाचे विविध टप्पे निर्धारित करण्यात आले आहेत. पहिला टप्पा म्हणून ५ सप्टेंबर रोजी ‘आम्हाला फक्त शिकवू द्या’ अशी हाक देत जिल्ह्यातील सर्व शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार आहेत. शिक्षक नेते मधुकर काठोळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असून यामध्ये जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश उदार, जिल्हा सरचिटणीस विठ्ठलदास आरू यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.
इब्टा म्हणते, फक्त शिकवू द्या !
आदर्श बहुजन शिक्षक संघटनेने (इब्टा) शिक्षण आयुक्तांकडे धाव घेत ‘आम्हाला फक्त शिकवू द्या’ अशी मागणी केली आहे. शिक्षक दिनी होणाऱ्या आंदोलनांमध्ये या संघटनेच्या शिक्षकांचाही सक्रीय सहभाग राहणार आहे. तर १७ सप्टेंबरला थेट आयुक्त कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वानखडे, सचिव सचिन तंबाख, सचिन ठाकरे, भूषण तंबाखे आदींनी या आंदोलनात शिक्षकांनी उतरण्याचे आवाहन केले आहे.