शिक्षक महासंघाचे मंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:48 PM2017-09-15T23:48:31+5:302017-09-15T23:48:46+5:30
गृहविभागाप्रमाणे सर्व शिक्षकांना रोकड विरहित वैद्यकीय बिलाची सुविधा उपलब्ध करून द्यावी,
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गृहविभागाप्रमाणे सर्व शिक्षकांना रोकड विरहित वैद्यकीय बिलाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी ‘अ’प्रमाणे कार्यवाही करुन तपासून सादर करण्याचे आदेश उपसचिवांना दिल्याचे भोयर यांनी सांगितले.
सध्या शिक्षकांनी उपचार घेतल्यानंतर व जवळची रक्कम रुग्णालयात दिल्यानंतर शासनाकडे बिल सादर करण्यात येते. त्यानंतर त्यांनी अदा केलेली रक्कम परत मिळते. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय किचकट असून यात बराच वेळ खर्च होतो. बºयाच शिक्षकांची बिलाची प्रकरणे २-३ वर्षे शासनदरबारी पडून राहतात. त्यामुळे शिक्षक महासंघातर्फे कॅशलेस योजनेची मागणी केली. नगरपालिका, मनपा शिक्षकांनाही वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्याची मागणी केली. सत्र २०१०-११, २०११-१२ व २०१२-१३ मध्ये नैसर्गिक वाढ मिळालेल्या तुकड्यांना अनुदान देण्यात यावे, २ मे २०१२ नंतरच्या अनेक शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या, परंतु, यात शिक्षकांची चूक नाही. त्यामुळे त्यांना पूर्ववत सेवेत घ्यावे, उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविलेल्या शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी खाते उघडावे, आरटीईचे उल्लंघन करुन उघडलेला पाचवा व आठवा वर्ग मंत्रालयीन स्तरावर निर्णय घेऊन बंद करावा आदी मागण्या करण्यात आल्या. १ व २ जुलै रोजी घोषित झालेल्या शाळांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. मूल्यांकन पात्र उच्च माध्यमिक विद्यालयाच्या याद्या लवकरच घोषित केल्या जातील, असे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिल्याचे भोयर यांनी सांगितले.