गुरुजी करा मज्जा..! पुढच्या सत्रात १२८ दिवस सुट्या
By अविनाश साबापुरे | Published: April 29, 2024 05:09 PM2024-04-29T17:09:37+5:302024-04-29T17:11:47+5:30
शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केले नियोजन : ११ मे यंदाच्या सत्राचा शेवटचा दिवस
यवतमाळ : एकीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे, निकालाची तयारी करणे, त्यातच निवडणूक ड्यूटी बजावणे अशा व्यस्त दिनक्रमात गुरफटलेल्या गुरुजींसाठी एक खूशखबर आहे. पुढच्या सत्रात त्यांना तब्बल १२८ दिवस हक्काच्या सुट्ट्या मिळणार आहेत. तर २३२ दिवस कामकाज करावे लागणार आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. जयश्री राऊत यांनी पुढील शैक्षणिक सत्राच्या कामकाजाचे नियोजन जाहीर केले आहे. त्यानुसार, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २०२३-२४ या चालू सत्राचा ११ मे हा शेवटचा कामकाजाचा दिवस राहणार आहे. त्यानंतर ४० दिवस उन्हाळी सुट्या मिळणार आहेत. १ जुलैपासून २०२४-२५ या नव्या शैक्षणिक सत्राचे कामकाज सुरू होणार आहे. १ जुलै ते २६ ऑक्टोबरपर्यंत प्रथम सत्राचे काम होईल. त्यानंतर दिवाळी सुटी आणि नंतर ११ नोव्हेंबर ते ३० एप्रिलपर्यंत द्वितीय सत्राचे काम होणार आहे.
या दरम्यान शिक्षकांना तब्बल ७६ सुट्या मिळणार आहेत. त्यात २० सार्वजनिक सुट्या, १० दिवस दिवाळी सुट्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील ३ सुट्या, ४० दिवसांच्या उन्हाळी सुट्या व मुख्याध्यापकांच्या अधिकारातील ३ सुट्यांचा समावेश आहे. या शिवाय या सत्रात तब्बल ५२ रविवारच्या सुट्या मिळणार आहेत. अशा एकंदर १२८ दिवस सुट्या मिळणार आहेत.
कोणत्या महिन्यात किती सुट्या?
मे - २३
जून - ३०
जुलै - ५
ऑगस्ट - ६
सप्टेंबर - ८
ऑक्टोबर - १०
नोव्हेंबर - १३
डिसेंबर - ६
जानेवारी - ४
फेब्रुवारी - ६
मार्च - ७
एप्रिल - ७