शिक्षकांच्या वेतनाचे पुन्हा त्रांगडे
By admin | Published: March 20, 2016 02:21 AM2016-03-20T02:21:11+5:302016-03-20T02:21:11+5:30
महिन्याच्या एक तारखेलाच शिक्षकांच्या खात्यात पगार जमा करण्याचा शासन निर्णय असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
डिसेंबरपासून प्रतीक्षा : दोन हजार खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक वंचित
यवतमाळ : महिन्याच्या एक तारखेलाच शिक्षकांच्या खात्यात पगार जमा करण्याचा शासन निर्णय असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील दोन हजार शिक्षकांना तर चक्क गेल्या तीन महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे होळीचा सण उधारीवर करण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांची संख्या मोठी आहे. प्लॅन आणि नॉनप्लॅन अशा वर्गवारीत मोडणाऱ्या या शाळांमध्ये दोन हजार शिक्षक सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यातील २०० शिक्षक एकट्या पुसद तालुक्यात आहेत. तर उर्वरित १८०० शिक्षक इतर तालुक्यांमध्ये कार्यरत आहेत. सन २००८ मध्ये ज्यांना अनुदान सुरू झाले, अशा १६४ खासगी प्राथमिक शाळा (प्लॅन) जिल्ह्यात आहेत. परंतु, येथील शिक्षकांना डिसेंबर २०१५, जानेवारी, फेब्रुवारी २०१६ या तीन महिन्यांचे वेतन अद्यापही मिळालेले नाही.
खासगी प्राथमिक शाळेतील दोन हजार शिक्षकांना नियमित आॅनलाईन वेतन मिळावे यासाठी स्पेशल पे युनिट (वेतन पथक) निर्माण करण्यात आले आहे. मात्र, या पथकातील कर्मचारी शिक्षकांच्या वेतनासाठी आवश्यक माहिती पुण्याच्या संचालनालयाकडे वेळेत पाठवित नाही. त्यामुळे तेथून जिल्ह्याकडे वंटन पाठविले जात नाही, असा आरोप शिक्षकांकडून होत आहे. या संदर्भात शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षण सभापतींना व्यथा सांगूनही उपयोग झालेला नाही, हे विशेष.
(स्थानिक प्रतिनिधी)
खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे वेतन नियमित व्हावे यासाठी शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे यांना निवेदन दिले आहे. खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या वेतनाबाबत अशीच चालढकल सुरू राहिल्यास नाईलाजाने इब्टा संघटनेमार्फत उपोषण करण्यात येईल.
- दिवाकर राऊत,
जिल्हाध्यक्ष, इब्टा संघटना
जिल्हा परिषदेचे आठ हजार शिक्षकही प्रतीक्षेत
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील आठ हजार शिक्षकही फेब्रुवारीच्या वेतनाची प्रतीक्षा करीत आहेत. अर्धा मार्च उलटल्यावरही फेब्रुवारीचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे शिक्षण विभागावर रोष व्यक्त केला जात आहे. एक तारखेला पगार देण्याचा आदेश फोल ठरल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे.