शिक्षक बदल्यांचा घोळ सर्वसाधारण सभेत गाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 09:29 PM2018-08-06T21:29:39+5:302018-08-06T21:29:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आधी ‘एसटी’चे प्रमाणपत्र जोडा म्हणणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांनी नंतर गुगल मॅपचेच अंतर ग्राह्य धरले जाईल, असा पवित्रा घेतला. प्रशासनाच्या या धरसोड धोरणाने बदली प्रक्रियेत ७७ शिक्षकांना दोषी ठरवून ५३ जणांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. ‘बोगस’चा शिक्का बसलेल्या या शिक्षकांनी आता आक्रमक पवित्र घेतला असून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी थेट अध्यक्ष-उपाध्यक्षांसह सदस्यांना बाध्य केले आहे.
सोमवारी अन्यायग्रस्त शिक्षकांनी जिल्हा परिषदेत धडक देऊन आधी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. प्रमाणपत्रांचे ‘व्हेरिफिकेशन’ करण्याची जबाबदारी प्रशासनाने टाळली. सुनावणीच्या वेळीही आम्हाला बोलूच देण्यात आले नाही, अशा शब्दात शिक्षकांनी संताप व्यक्त केला.
त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांची भेट घेऊन सर्व घोळ त्यांच्या लक्षात आणून देण्यात आला. कागदपत्रांची पडताळणी करताना काही दोषी शिक्षकांना मुद्दाम ‘अॅडजस्ट’ करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. अध्यक्ष तसेच उपाध्यक्षांनी या मुद्द्यावर प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा परिषद सदस्य आशीष लोणकर यांनी अन्यायग्रस्त शिक्षकांची भेट घेतली. १३ आॅगस्ट रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत शिक्षण विभागाला बदल्यांतील घोळ निस्तरण्यासाठी भाग पाडू, असा शब्द त्यांनी शिक्षकांना दिला.
न केलेल्या गुन्ह्यात तीन वेळा शिक्षा
बदलीसाठी एसटीचे प्रमाणपत्र आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जोडले. त्यामुळे आम्ही कोणताच गुन्हा केला नाही. पण आम्हाला तीन वेळा शिक्षा देण्याचा घाट घातला जात आहे. यंदा आमची वेतनवाढ रोखण्याचे संकेत आहे. पुढच्या वर्षीच्या बदलीत आम्हाला रॅण्डम राऊंडमध्ये टाकले जाणार आहे. तर आता प्रतिनियुक्तीने दुर्गम शाळेत पाठविले जाणार आहे. हा अन्याय दूर करून आमचे एसटीचेच प्रमाणपत्र ग्राह्य धरावे, अशी मागणी संवर्ग दोनमधील शिक्षकांनी केली.