राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:08 PM2018-03-07T12:08:54+5:302018-03-07T12:11:11+5:30

राज्यात २४ हजार जागा येत्या सहा महिन्यात भरणार, असा दावा एकीकडे शिक्षणमंत्र्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाने नव्या शिक्षक भरतीचा मार्ग खडतर केला आहे.

Teachers recruitment in the state is closed again | राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग पुन्हा बंद

राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग पुन्हा बंद

Next
ठळक मुद्दे‘कम्पलसरी व्हॅकन्सी’चा खोडाअतिरिक्त शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवण्याचे आदेश

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यात २४ हजार जागा येत्या सहा महिन्यात भरणार, असा दावा एकीकडे शिक्षणमंत्र्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाने नव्या शिक्षक भरतीचा मार्ग खडतर केला आहे. जिल्हा परिषद शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या जागा ‘कम्पलसरी व्हॅकन्सी’ म्हणून नोंदविण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने शनिवारी दिल्यामुळे आता नव्या भरतीसाठी जागा कुठून उपलब्ध होतील, हा प्रश्न डीएडधारकांपुढे उभा ठाकला आहे.
तब्बल पाच वर्षानंतर शिक्षक भरतीचे सुतोवाच शिक्षण विभागाने केले आहे. त्यासाठी नुकतीच डिसेंबर महिन्यात बुद्धीमत्ता आणि अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली. ही परीक्षा देणारे पावणे दोन लाख विद्यार्थी अडीच महिन्यानंतरही ‘रिझल्ट’च्याच प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे फेब्रुवारीमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २४ हजार शिक्षक पदे सहा महिन्यात भरणार असल्याचे जाहीर केले. सध्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया ‘पाईपलाईन’मध्ये आहे. ती पूर्ण होताच रिक्त जागा भरल्या जातील, असा दावा केला जात आहे.
१ जानेवारी रोजीच्या पटसंख्येनुसार जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक आदींची तब्बल १४ हजार पदे अतिरिक्त ठरली आहेत. तर हजारो शाळांमध्ये पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षकांची उपलब्धता नाही. त्यामुळे बदली प्रक्रियेनंतर रिक्त जागांवर नवी भरती केली जाईल, अशी आशा ‘टेट’च्या परीक्षार्थ्यांना होती. त्यात आता ग्रामविकास विभागाच्या ‘कम्पलसरी व्हॅकन्सी’च्या आदेशाने खोडा घातला आहे.
या आदेशानुसार, संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. परंतु, ते ज्या शाळेत अतिरिक्त ठरले आहेत, तेथील जागांवर यापुढे कोणत्याही शिक्षकांची बदली करू नये, असे आदेशात म्हटले आहे. बदली प्रक्रियेसाठी त्या जागांचे मॅपिंग करताना तेथे ‘कम्पलसरी व्हॅकन्सी’ (अनिवार्य रिक्त जागा) दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील १४ हजार शिक्षक पदे व्यपगत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बंद होणाऱ्या शाळांची संख्या वाढणार
शिक्षण विभागाने आधीच १० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद केल्या आहेत. तर आता ३० पेक्षा कमी पटांच्या शाळांची आकडेवारी गोळा करणे सुरू केले आहे. ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हे संचमान्यतेचे सूत्र आहे. आता संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या जागाच कायमच्या रिक्त ठेवण्याचे आदेश ग्रामविकासने दिले. त्यामुळे ३० पेक्षा कमी पटाच्या शाळाही येत्या सत्रात बंद होण्याचा धोका स्पष्ट झाला आहे.

Web Title: Teachers recruitment in the state is closed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक