आचारसंहितेतून निसटल्या शिक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 09:41 PM2019-03-12T21:41:27+5:302019-03-12T21:42:23+5:30
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध कामांना ‘ब्रेक’ लागलेला असला, तरी जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया मात्र आचारसंहितेच्या काळातच राबविली जाणार आहे. गेल्या वर्षी एका क्लिकवर जम्बो बदल्या करून चुका पदरात पाडून घेणारे प्रशासन यंदाही सहाशे ते सातशे शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या तयारीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध कामांना ‘ब्रेक’ लागलेला असला, तरी जिल्हा परिषदशिक्षकांची बदली प्रक्रिया मात्र आचारसंहितेच्या काळातच राबविली जाणार आहे. गेल्या वर्षी एका क्लिकवर जम्बो बदल्या करून चुका पदरात पाडून घेणारे प्रशासन यंदाही सहाशे ते सातशे शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या तयारीत आहे.
अचारसंहितेची घोषणा कोणत्याही क्षणी होणार हे लक्षात घेऊनच ग्रामविकास विभागाने जिल्हापरिषदेला ८ मार्च रोजीच बदली प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला. १० मार्चपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाली असली, तरी आता २५ मार्चपासून शिक्षकांना बदलीसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर तत्पूर्वी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची यादी (मॅपिंग) तयार करण्यात गुंतलेला आहे.
यंदाही चार संवर्ग पाडून शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. मागील वर्षी दीर्घ प्रतीक्षेनंतर साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यंदा मात्र ही संख्या घटून सहाशे ते सातशे शिक्षकांच्या बदल्या होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. सेवेला दहा वर्ष झालेले शिक्षक आणि एकाच शाळेत सलग तीन वर्षे असलेले शिक्षक बदलीसाठी पात्र ठरणार आहेत.
मात्र बहुतांश शिक्षकांना गेल्यावर्षीच नवी शाळा मिळाल्याने अनेक जण तीन वर्षांचा निकष पूर्ण करीत नाही. तर ज्यांच्या सेवेला दहा वर्षे झाली, अशीही मंडळी गेल्या वर्षीच बदलीच्या ठिकाणी रुजू झाली. यामुळे यंदा बदलीपात्र शिक्षकांची संख्या हजाराच्या आतच राहण्याची शक्यता आहे.
परीक्षेच्या काळात बदल्या नको
बदलीसाठी अर्च भरण्याची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र याच काळात विविध शाळांमध्ये परीक्षा सुरू होणार आहेत. शिवाय, अनेक शिक्षकही निवडणुकीच्या कामात गुंतणार आहेत. या धावपळीत बदली प्रक्रिया राबवू नये. आचारसंहिता संपल्यानंतरच बदली प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य मधुकर काठोळे यांनी केली आहे. तर गेल्या वर्षी रॅण्डम राऊंडमध्ये जे विस्थापित झाले, अशा शिक्षकांना यंदाच्या बदली प्रक्रियेत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्राथमिक शिक्षक परिषदेचे गजानन पोयाम यांनी केली आहे.
आचारसंहितेच्या आधी आणि नंतर
शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आचारसंहितेपूर्वी देण्यात आले. तर प्रत्यक्ष बदलीचे आदेश मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला काढले जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची ही बदली प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यातून सहिसलामत सुटणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.