व्यवस्थेविरुद्ध शिक्षकांनी सावध झाले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:35 PM2017-12-18T22:35:20+5:302017-12-18T22:35:36+5:30
सगळी आंदोलने संपली तरी सरकारला जाग येत नाही. शिक्षकांना बाजूला ठेवून शिक्षणप्रक्रिया चालविण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : सगळी आंदोलने संपली तरी सरकारला जाग येत नाही. शिक्षकांना बाजूला ठेवून शिक्षणप्रक्रिया चालविण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. याची किंमत शासनाला चुकवावी लागेल. शिक्षकांना वाचविण्यासाठी अविरत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे मत औरंगाबादचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केले.
शिक्षक महासंघाच्या वतीने यवतमाळ येथील संदीप मंगलम्मध्ये शैक्षणिक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार काळे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ‘आजच्या शिक्षण व्यवस्थेची दशा व दिशा’ या विषयावरील या परिसंवादात प्रमुख वक्ते प्रवीण देशमुख, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर, संस्थाचालक महामंडळाचे विदर्भ अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, सावरगाव येथील वसंत शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रवीण देशमुख, पुसदच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव अनिरुद्ध चोंढीकर, देवराव पाटील ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे मनीष पाटील, पुसदच्या युवक शिक्षण संस्थेचे सचिव विजय जाधव, बाभूळगावच्या सुदाम शिक्षण प्रसारक मंडळाचे कृष्णा कडू, बाळासाहेब धांदे, पद्माकर राऊत, खान, जयंत पाटील, बी.जी.राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण व्यवस्था वाचविण्यासाठी आणि बहुजनांना शिक्षण मिळावे हाच परिसंवादाचा हेतू असल्याचे शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सांगितले. संस्थाचालकांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली असून शासन मात्र शिक्षण व्यवस्थेला बाजारात उभे करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप प्रा. प्रवीण देशमुख यांनी केला. विनाअनुदानित हे तत्व फक्त शिक्षणक्षेत्रातच का, असा सवाल वसंतराव घुईखेडकर यांनी उपस्थित केला. परिसंवादाच्या निमित्ताने सर्व शिक्षणप्रेमी एकत्र आल्याची भावना महेश करजगावकर यांनी व्यक्त केली. यावेळी शिक्षक महासंघाच्या अॅपचे उद्घाटन करण्यात आले. या अॅपबद्दल अमरावती जिल्हाध्यक्ष मनोज कडू यांनी माहिती दिली. अमरावती येथील दृष्टिहीन कलावंतांच्या सुमधूर गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. परिसंवादाचे संचालन देवेंद्र आत्राम, तर आभार यवतमाळ जिल्हाध्यक्ष नीलेश तायडे यांनी मानले.