शिक्षकांनी शेतकऱ्यांना आधार द्यावा
By admin | Published: September 24, 2015 03:02 AM2015-09-24T03:02:59+5:302015-09-24T03:02:59+5:30
शेतकऱ्यांचे मनोधर्य वाढवून त्यांना आधार देण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक..
आवाहन : प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकांसोबत चेतना अभियानावर अधिकाऱ्यांची चर्चा
यवतमाळ : शेतकऱ्यांचे मनोधर्य वाढवून त्यांना आधार देण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांनी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
बचत भवन येथे चेतना अभियानांतर्गत प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.रविंद्र आंबेकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते. शिक्षकांना समाजात फार मोठा मान आहे. विद्यार्थ्यांवर खऱ्या अर्थाने शालेय जीवनात शिक्षक उत्तम संस्कार करत असतो. या वयातच विद्यार्थ्यांमध्ये कणखर व लढाऊ वृत्ती निर्माण होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना अशाप्रकारचे संस्कार द्यावे. यामुळे पुढे तो परिस्थितीचा सामना करेल, परंतु आत्महत्या करणार नाही. तसेच कुणाला करूही देणार नाही. यासाठी शिक्षकांनी गावागावात पालकांच्या सभाही घ्याव्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्राध्यापक शिक्षकांना सांगितले.
शिक्षकांनी अभियानासाठी चेतना दूत म्हणून काम करावे. त्यांच्या समस्या, अडचणी समजून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध वत्कृत्व स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना मांडण्यासाठी प्रोत्साहित करावे.
चेतना अभियानांतर्गत शाळा स्तरावर पालकसभा व त्या माध्यमातून जनजागृती शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विनामूल्य शिकवणी वर्ग, आदर्श शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतरापर्यंत पोहोचविणे याबाबी अभियानांतर्गत शिक्षकांकडून होणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी अनेक शिक्षकांनी चर्चेत सहभागी होवून स्वयंस्फूर्तीने अभियानास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिक्षक, प्राध्यापक आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)