ठाणेगाव शाळेत शिक्षकांना डांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:03 AM2018-08-22T00:03:15+5:302018-08-22T00:04:18+5:30
तालुक्यातील ठाणेगाव येथील पालकांनी शिक्षकाच्या मागणीसाठी मंगळवारी शाळेतच केंद्र प्रमुखासह शिक्षकांना डांबले. तब्बल सहा तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : तालुक्यातील ठाणेगाव येथील पालकांनी शिक्षकाच्या मागणीसाठी मंगळवारी शाळेतच केंद्र प्रमुखासह शिक्षकांना डांबले. तब्बल सहा तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
ठाणेगाव येथील शाळेत शिक्षक नसल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने पालकांनी ६ आॅगस्टला शाळेला कुलूप ठोकले. तेव्हापासून शाळा बंद आहे. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमही पालकांनीच ध्वजारोहण करून साजरा केला. शिक्षकांच्या मागणीसाठी पंचायत समितीत गेलेल्या पालकांना हाकलून लावण्यात आले, असा आरोप आहे. पंचायत समितीने दोन साधन व्यक्तींची तात्पुरती नियुक्ती केली. ते गावातील चावडीत मुलांना शिकवित आहे. मंगळवारी केंद्र प्रमुख गलाट यांच्यासोबत आडे नावाचे शिक्षक तेथे पोहोचले. त्यांनी गावकऱ्यांना ठोस आश्वासन न दिल्याने गावकऱ्यांनी त्यांच्यासह साधन व्यक्ती संजय पवार, चेतन पंधरे या चौघांना तब्बल सहा तास डांबून ठेवले.
अखेर सहायक बीडीओ मंगेश आरेवार, साधना चौधरी, पारवा ठाणेदार यांनी गावात पोहोचून शिक्षक देण्याची ग्वाही दिली. आरेवार यांनी गावकऱ्यांना तसे लेखी आश्वासन दिले. यामुळे शांत झालेल्या पालकांनी अखेर चौघांची सुटका केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किसन सुरपाम, पोलीस पाटील नविता मारपवार आदी उपस्थित होते.