लिपिकावर कारवाईच्या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:44 AM2021-08-26T04:44:45+5:302021-08-26T04:44:45+5:30
कामे वेळेत होत नसल्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड रोष आहे. शिक्षक संघटनांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. लिपीक ...
कामे वेळेत होत नसल्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड रोष आहे. शिक्षक संघटनांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. लिपीक शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी प्रकरणे, वैद्यकीय देयक, वरिष्ठ निवड श्रेणी प्रकरणे वेळेत तयार करीत नाही. रजेचे पगार व सर्व प्रकरणाकरिता आर्थिक व्यवहाराची अपेक्षा ठेवतात. मासिक पगार बिल वेळेत सादर करीत नाही. सेवापुस्तक वारंवार विनंती करूनही अद्ययावत करीत नाही. अद्याप स्थायित्व नोंदी व भाषा सूट नोंदी घेतल्या नाही.
हेतूपुरस्सर शिक्षकांच्या महत्वाच्या फाईल गहाळ करणे, निवृत्त शिक्षकाची प्रकरणे प्रलंबित ठेवून त्यांना नाहक त्रास देणे, थकीत वेतन व इतर बिल सुमारे वर्षभर जवळ ठेवून निधीची मागणी करणे, आदी आरोप निवेदनातून करण्यात आले आहे. त्या लिपीकावर कारवाई करुन शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ७ दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ययवतमाळ जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, आदिवासी एम्प्लाईज शिक्षक संघटना आदींनी दिला आहे.